राज्य सरकारने रद्द केलेल्या हकीम समितीच्या रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीला उच्च न्यायालयाने मान्यता दिली असली तरी रिक्षा व टॅक्सी मीटरचे रिकॅलिबरेशन होईपर्यंत ही भाडेवाढ लागू होणार नाही. विशेष म्हणजे मीटर रिकॅलिबरेशनसाठी आवश्यक केंद्रांची वानवा असल्याने या प्रक्रियेसाठी जुलैचा मुहूर्त उजाडणार आहे. वैधमापन शास्त्र विभागातर्फे रिकॅलिबरेशन प्रक्रियेसाठी सात नवीन केंद्रे उभारली जाणार असून गरज भासल्यास त्यात आणखी केंद्रांची भर पडेल. मुंबई शहर व उपनगर येथील १ लाख चार हजार रिक्षा आणि ४२ हजार टॅक्सी यांच्या भाडय़ांत एका रुपयाने वाढ करण्याच्या हकीम समितीच्या शिफारशीला उच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. या वाहनांच्या नव्या दराप्रमाणे मीटर रिकॅलिबरेशन करण्यासाठी ४५ दिवसांचा कालावधीही देण्यात आला आहे. रिकॅलिबरेशन प्रक्रियेची जबाबदारी परिवहन विभागाऐवजी आता वैधमापन शास्त्र विभागाकडे सोपवण्यात आली आहे. पण या तब्बल दीड लाख वाहनांसाठी मुंबईत फक्त दोनच रिकॅलिबरेशन केंद्रे आहेत.  रिकॅलिबरेशन वेगाने होण्यासाठी आणखी सात केंद्रे सुरू होतील.

रिकॅलिबरेशनसाठी मीटरमधील  चीप रिकॅलिबरेट करावी लागते. त्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये बदल आवश्यक असतो. राज्यातील १२ कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबत संघटनांना सहकार्याचे आवाहन वैधमापन शास्त्र विभागाचे नियंत्रक संजय पांडे यांनी केले आहे.