काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ओवाळून टाकलेल्या अनेकांना निवडणुकीच्या तोंडावर पक्षात स्थान दिल्यामुळे भाजपची अवस्था काँग्रेससारखी झाली आहे. अशा परिस्थितीत भाजपपेक्षा काँग्रेस परवडली, असे सूचक वक्तव्य शिवसेनेकडून करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेना काँग्रेससोबत हातमिळवणी करण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखात यासंदर्भात भाष्य करण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरुच आहे. त्रिशंकू परिस्थितीमुळे ३१ नगरसेवकांचे संख्याबळ असलेल्या काँग्रेसच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, भाजपकडून कुठल्याही स्थितीत काँग्रेससोबत जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे शिवसेना काय करणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने  सत्तास्थापनेसाठी काँग्रेस अस्पृश्य नसल्याचे संकेत दिले आहेत. भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक ओवाळून टाकलेल्या लोकांची भरती करून स्वपक्षाची काँग्रेस केली आहे. मात्र, अफझल गुरूसारख्या अतिरेक्यांचे खुलेपणाने समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्तीबरोबर सत्ता उबवणे जास्त घातक आहे. त्यापेक्षा काँग्रेस परवडली, असे सांगत शिवसेनेने भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, भाजप काँग्रेससोबत जाणार नाही, जायचे असेल त्यांनी जावे. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचे स्वागत करतो. मात्र, मुख्यमंत्र्यांनी असे बोलायला हवे होते की, आम्ही म्हणजेच भाजप काँग्रेससोबत जाणार नाही, पण पाकिस्तानवादी मेहबुबा मुफ्तीसोबत जाणार, असे सांगत सेनेने भाजपला टोला लगावला आहे.

अफझल गुरूस काँग्रेस राजवटीत फासावर लटकवले व मेहबुबा मुफ्ती या भाजपबरोबर सत्तेत असताना अफझल गुरूस ‘हुतात्मा’ वगैरे मानतात, हे शिवरायांसमोर मस्तक टेकणाऱ्यांना चालते काय? अफझल गुरूस शहीद किंवा क्रांतिकारक मानणे म्हणजे अफझलखानास शिवशाहीचे प्रेरणास्थान मानण्यासारखेच आहे, अशी टीकाही शिवसेनेने केली आहे.

भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जवळपास समान जागा मिळाल्यानंतर, महापौरपदासाठी वेगवेगळी गणिते मांडण्याचे प्रयत्न होत असताना या दोन्ही पक्षांतील दरी आणखी वाढवून भाजपची कोंडी करण्याची रणनिती विरोधी पक्षांनी आखली आहे. मुंबईत महापौरपदासाठी भाजपला मदत करणार नाही, असे स्पष्टपणे सांगितल्यानंतर, शिवसेनेला मात्र अप्रत्यक्षरीत्या मदत पुरवण्यात येऊ शकते, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले असून, त्यामुळे आता पुढे कुठली समीकरणे उदयास येतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी, उभय पक्षांतील वाद वाढायला नको, म्हणून राज्य मंत्रिमंडळाची उद्या, मंगळवारी होणारी बैठकच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केल्याचे कळते.