रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पात सुरक्षित प्रवास आणि शून्य अपघातासाठी भरीव तरतूदी करण्याची घोषणा करून चार दिवस उलटत नाहीत तोच पेणजवळ मंगला एक्सप्रेसचे तीन डबे रूळांवरून घसरले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या ठिकाणी मध्य रेल्वेची आणखी एक मार्गिका तयार असल्याने कोकणात जाणारी वाहतूक या मार्गिकेवर वळवण्यात आली. परिणामी वाहतुकीलाही काही फटका बसला नाही.
एर्नाकुलमहून हजरत निझामुद्दीनला जाणारी मंगला एक्सप्रेस ही गाडी संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास पेण स्थानकात घसरली.
या गाडीचे एस-९, एस-१० आणि स्वयंपाकडबा (पेण्ट्री कार) असे तीन डबे रूळांवरून खाली घसरले. गाडीचा वेग अत्यंत कमी असल्याने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मध्य रेल्वेची देखभाल-दुरुस्ती करणारी गाडी पेण रेल्वे स्थानकातच असल्याने हे डबे पुन्हा रूळांवर चढवण्याचे काम सुरू करण्यात आले. तसेच पेणजवळ मध्य रेल्वेची लूप लाइन असल्याने कोकणात जाणारी किंवा कोकणातून येणारी वाहतूक खोळंबली नाही.