जेष्ठ चित्रकार व ‘टॉनिक’ या मुलांच्या दिवाळी अंकाचे संपादक कृष्णा ल. मानकर ऊर्फ मानकरकाका यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी कथा, मुलगा चित्रभूषण, सून व दोन नातवंडे असा परिवार आहे.

कौटुंबिक कामासाठी मानकरकाका विठ्ठलवाडी येथे गेले होते. तेथूनच ते विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या विवेकानंद व्याख्यानमालेस जाण्यासाठी निघाले असता त्यांना लोकलमध्ये अस्वस्थ वाटू लागले. सहकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान शनिवारी सकाळी ९. ४० वाजता त्यांचे निधन झाले. मानकरकाका यांच्यावर साने गुरुजींच्या विचारांचा पगडा होता. या प्रभावातूनच त्यांनी मुलांवर संस्कार व्हावेत या दृष्टिकोनातून १९७९पासून ‘टॉनिक’ हा दिवाळी अंक प्रकाशित करण्यास सुरुवात केली. गेली ३६ वष्रे अथकपणे ‘टॉनिक’ या दिवाळी अंकाचे नियमित प्रकाशन होते.
यंदाचा दिवाळी अंक ‘जपान’ या देशावर आधारित आहे. ‘टॉनिक’ला गेल्या ३६ वर्षांत ५६ पुरस्कार मिळाले आहेत. मानकरकाका बालनुक्कड चित्रकला स्पर्धा भरवीत असे. उत्कृष्ट चित्रांना पारितोषिकही देत होते.चंद्रकांत खोत, दादा गावकर हे त्यांचे गुरू होते. कामगारांसाठी झटणाऱ्या ‘विद्यार्थी उत्कर्ष मंडळ’ या संस्थेसाठी काका गेली ६० वर्षे काम करीत होते.