रोजच्या जेवणाचा अविभाज्य घटक असलेल्या तूरडाळीला गेल्या काही महिन्यांमध्ये पडलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसराला अन्नधान्याचा पुरवठा करणाऱ्या वाशीतील घाऊक बाजारात तूरडाळीचे दर किलोमागे ८८ रुपयांपर्यंत पोहोचल्याने किरकोळ बाजारात या डाळींच्या दराने थेट शंभरी गाठली आहे. उत्तम प्रतीच्या तूरडाळीसाठी किरकोळ बाजारात १०० ते १०५ रुपयांचा दर आकारला जाऊ लागल्याने ग्राहकांची अक्षरश: लूट सुरू आहे. उडीद आणि मूगडाळीचे दरही गेल्या पंधरवडय़ापासून वाढल्याने त्याचाही फटका बसत आहे.
गेल्या महिनाभरामध्ये राज्यभरात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अकोला, अमरावती, वर्धा, सोलापूर, जालना, लातूर अशा भागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर तूरडाळीचे उत्पादन होत असते. याशिवाय गुजरातच्या काही भागांमधून मुंबईच्या बाजारपेठेत डाळींची आवक होते. राज्य सरकारने काही महिन्यांपासून डाळींच्या मुक्त व्यापारास परवानगी देत एपीएमसी कायद्यातून त्या मुक्त केल्या आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत डाळींवर आकारले जाणारे कर मुक्त झाल्याने किमती कमी होतील, अशी शक्यता व्यक्त
केली जात होती. मात्र अवकाळी पावसामुळे यावर सध्या तरी पाणी फेरल्याचे दिसू लागले आहे. आवक घटल्याने गेल्या काही दिवसांपासून तूरडाळीची घाऊक किंमत किलोमागे ८५ ते ८८ रुपयांपर्यंत पोहोचली आहे, अशी माहिती बाजार समितीचे उपसचिव रवी पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

डाळींचे घाऊक दर
* तूरडाळ ८८ रुपये, उडीदडाळ ८६ रुपये किलो, मूगडाळ १०० रुपये किलो, सुटे मूग ९० रुपये किलो
* डाळींच्या घाऊक दरांमध्ये गेल्या महिन्याच्या तुलनेत जास्त वाढ
* अवकाळी पावसामुळे आवक घटल्याने ही वाढ झाल्याचा व्यापाऱ्यांचा दावा
* ज्वारी, बाजरी, गहू, तांदळाचे दर मात्र अजून नियंत्रणात