निर्धारित वेळेत रस्त्यांची कामे पूर्ण न केलेल्या २६ कंत्राटदारांवर मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेतर्फे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कुलाबा शाखेतर्फे १३ तर मुलुंड शाखेतर्फे नऊ कंत्राटदारांवर कारवाई करण्यात आली आहे. १ आक्टोबर २०१४ ते ३० एपिल २०१५ या कालावधीत उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
स्थानिक नियमन आणि मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १०२ आणि ११५ अंतर्गत वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी १८ कंत्राटदारांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कायद्यांतर्गत कंत्राटदारांकडून २०० रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित आठ कंत्राटदारांवर मुंबई पोलीस कायद्याच्या कलम ३३ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कायद्यांतर्गत खराब रस्त्यांमुळे विस्कळीत होणारी वाहतूक व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने कारवाई तसेच उपाययोजना करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत.