मुंबईतील मोक्याच्या आणि धंद्यासाठी सोयीच्या जागांवरील झाडांचा अडसर दूर करण्यासाठी दिवसाढवळ्या या वृक्षांवर विषप्रयोग करण्याचे षड्यंत्र राबवले जात असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस येत आहे. मालाडमधील एका झाडावरील असा विषप्रयोग पर्यावरणप्रेमींनी उघडकीस आणूनही महापालिकेने या प्रकरणी कोणतीही कारवाई सुरू न केल्याने अखेर मालाड पोलिसांनीच चौकशी सुरू केली आहे. एकीकडे मुंबईतील वृक्षांवर कीटकांचा हल्ला होऊन शेकडो वृक्ष मान टाकत असतानाच या विषप्रयोगाने महापालिका प्रशासनालाच लागलेली कीड उघड झाली आहे.
मालाड येथील काचपाडा बसथांब्याच्या बाजूला एक हिरवागार पर्जन्यवृक्ष डौलात उभा होता. या वृक्षाची पाने अचानक गळून पडल्याचे क्षितिज अष्टेकर यांना दिसले. दोन दिवसांत हिरवा पर्णसांभार गळून पडणे अशक्य असल्याने, त्यांनी वृक्षप्रेमी ऋषी अगरवाल यांच्यासोबत या झाडाची पाहाणी केली. तेव्हा झाडाच्या खोडावर तब्बल ४० ठिकाणी खिळे मारल्यासारख्या खुणा होत्या. या भोकातून काडी दोन ते तीन इंच आत जात होती व त्यात पांढऱ्या रंगाचा चिकट द्रव बाहेर येत होता. हा द्रव म्हणजेच रासायनिक विष असल्याचा आरोप ऋषी अगरवाल यांनी केला आहे. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यावर बांगुरनगर पोलिसांनी रसायनांचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यावर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ७२ तासांनी येऊन पाण्याचे फवारे मारले. मात्र तोपर्यंत विष सर्वत्र पसरले होते. असे प्रकार शहरात अनेक ठिकाणी दिसत आहेत, मात्र त्यावर कोणतीही कारवाई होत नाही, असे ऋषी अगरवाल म्हणाले.
इन्फिनिटी मॉलशेजारी हॉटेलला अडचणीचे ठरणारे झाड आडवे करण्यासाठीही पद्धतशीर प्रयत्न केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. गेल्या काही दिवसांत झाडाच्या खोडावर खिळ्याने टोचल्याचे दिसत आहे व झाड मृत्युपंथाला लागले आहे, असे संतोष गुप्ता यांनी सांगितले. मात्र हे झाड नैसर्गिकरीत्या सुकले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कांचपाडा येथील झाडांतील द्रव बाहेर काढून प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे व तपास सुरू आहे, असे बांगुरनगरचे वरिष्ठ निरीक्षक जवळकर यांनी सांगितले.

१५० कोटींचा निधी पडून
पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे १५० कोटी रुपयांचा निधी पडून असताना समितीच्या बैठकीत केवळ झाडे तोडण्याचेच प्रस्ताव संमत होतात. ऑगस्ट क्रांती मैदानातील झाडे कातरण्याच्या नावाखाली बोडकीच करण्यात आली आहेत, असा घरचा आहेर भाजपचे नगरसेवक दिलीप पटेल यांनी बुधवारी स्थायी समितीत दिला.