ठाणे जिल्हा शासकीय रूग्णालयातील कनिष्ठ लिपीकासह कक्षसेवकाला साडेतीन लाख रुपयांची लाच घेताना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी अटक केली. रूग्णालयात जनरेटर पुरविणाऱ्या ठेकेदाराला बिलाच्या रकमेचा धनादेश देण्यासाठी या दोघांनी लाच स्वीकारल्याचे तपासात पुढे आले आहे.
रविंद्र रामधन राठोड (३३),असे कनिष्ठ लिपिकाचे तर गिरीश मधुकर पवार (३३), असे कक्षसेवकाचे नाव आहे. तक्रारदार यांची जनरेटर पुरवठा कंपनी असून त्यामार्फत ते जनरेटर पुरविण्याचे काम करतात. ठाणे जिल्हा शासकीय रूग्णालयात जनरेटर पुरविण्याचे काम त्यांच्या कंपनीला मिळाले होते. त्यानुसार, त्यांनी रूग्णालयात जनरेटरचा पुरवठा केला होता. या कामाच्या बिलाविषयी त्यांनी रविंद्र राठोड याच्याकडे चौकशी केली होती. त्यावेळी त्याने कामाच्या रकमेचा धनादेश देण्यासाठी चार लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार, या विभागाच्या पथकाने सोमवारी ठाणे जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या प्रशासकीय इमारतमध्ये सापळा रचून साडेतीन लाख रूपयांची लाच घेताना दोघांना रंगेहाथ पकडले.