भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२४ वा जयंती उत्सव सर्वत्र उत्साहात आणि शांततेत साजरा होत असताना मुंबईत झालेल्या दोन दुर्घटनांनी गालबोल लागले. दोन वेगवेगळ्या दुर्घटनांत दोन तरुणांना आपले प्राण गमावावे लागले. घाटकोपर येथे एका मंडपात बुद्धवंदना सुरू असातना मंडपातील वायरीचा शॉक लागून एका तरुणाचा मृत्यू झाला, तर सायन येथे मोटारसायकल रॅलीमधील एका मोटारसायकलीला डंपरने धडक दिल्याने अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला.
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरातील डी. बी. पवार चौकात एक मंडप उभारण्यात आला होता. सोमवारी रात्री जयंतीउत्सवानिमित्त रोषणाई करण्यात आली होती. बुद्धवंदना सुरू असताना वायरीचा स्पर्श झाल्याने आकाश गुरव (२२) या तरुणाला विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला. पंतनगर पोलिसांनी याप्रकरणी वायरींची व्यवस्था करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.
मंगळवारी भांडुपच्या मिलिंद तरुण मित्रमंडळाच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सकाळी भांडुप ते चैत्यभूमी मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते. सायन उड्डाण पुलावरून ही मोटारसायकल रॅली जात होती. त्या वेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या एका डंपरने एका मोटारसायकलीला धडक दिली. या धडकेत मोटारसायकलचालक गजानन दाभाडे (३२) जखमी झाला तर त्याच्या मागे बसलेला आदित्य वलेकर (१२) हा जखमी झाला. त्याला उपचारासाठी सायन रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सायन पोलिसांनी याप्रकरणी डंपरचालक मोहनलाल विश्वकर्मा याला अटक केली आहे.