सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चेनंतर उद्धव यांचे सूचक वक्तव्य

शिवसेना-भाजपमधील तणाव वाढलेला असताना अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गुरुवारी भेट घेऊन सामोपचार घडविण्यासाठी चर्चा केली. त्यानंतर ‘उभयपक्षी वादाचे काय होईल, हे माहीत नाही, ते दोन्ही पक्षांवर अवलंबून आहे’, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले. ‘राज्यातच नाही, तर देशातील वाघ वाढायला हवेत, यावर आमचे एकमत झाले’ असा टोला ठाकरे यांनी लगावला. शिवसेनेची आक्रमक भूमिका कायम असल्याचे दिसून येत असून भाजपही माघार घेण्याच्या स्थितीत नसल्याने वाद शमण्याची चिन्हे नाहीत.

शिवसेनेकडून भाजपच्या सर्वोच्च नेत्यांवर आक्रमकपणे टीका करण्यात येत असल्याने अध्यक्ष अमित शहा संतापले आहेत. शिवसेनेकडून भाजपच्या नेत्यांचे पुतळे जाळणे, ‘मनोगत’ मुखपत्राचे अंक जाळणे, प्रतिमांना जोडे मारणे, हे प्रकार सुरूअसल्याने भाजपनेही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. हा संघर्ष वाढत असल्याच्या पाश्र्वभूमीवर मुनगंटीवार यांनी ठाकरे यांना १ जुलै रोजी होणाऱ्या वृक्ष लागवड कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याच्या निमित्ताने ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही पक्षांमध्ये वाद असतानाही ठाकरे यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

दोन्ही पक्षांमध्ये तणाव नसून कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दोन्ही पक्ष एकत्रित काम करीत असून अन्य कोणी किरकोळ गोष्टींचा बाऊ करून चिंता करण्याची आवश्यकता नसल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

  • ठाकरे यांनी मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांची वक्तव्ये, मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांच्या ‘मनोगत’मधील लेखाची भाषा आदींबाबत तीव्र आक्षेप घेतला.
  • शिवसेनेला दुय्यम खाती देण्यात आली आहेत, योग्य सन्मान राखला जात नाही, याबाबतही त्यांनी नापसंती व्यक्त केली. मंत्र्यांकडच्या खात्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल आणि दोन्ही पक्षांमध्ये संवाद ठेवण्यावर पुढील काळात प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.