मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या रिंगणात हट्टाने उतरलेल्या स्वपक्षाच्या उमेदवारांना पराभवाची धूळ चारण्यासाठी मतदानाच्या दिवशीच पालिका सभागृहाची बैठक आयोजित करून नगरसेवकांना व्यस्त ठेवण्याची खेळी थेट ‘मातोश्री’ने केल्याची चर्चा शिवसेनेमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे सभागृहाच्या बैठकीला शिवसेनेचे बहुसंख्य उमेदवार उपस्थित होते. परिणामी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन येण्यासाठी उमेदवारांच्या समर्थकांची पळापळ सुरू होती.
बँकेच्या संचालक मंडळाची  सोमवारी निवडणूक झाली. त्यात विनोद घोसाळकर यांनी पुत्रासह काही समर्थकांना उमेदवारी देण्यास ‘मातोश्री’ला भाग पाडले होते. यापूर्वी शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे, शुभा राऊळ आणि भाजपच्या मनीषा चौधरी यांनी घोसाळकर यांच्याबाबत अनेक तक्रारी ‘मातोश्री’कडे केल्या होत्या. त्याचे तीव्र पडसाद सभागृहातही उमटले होते. त्यानंतर ‘मातोश्री’ने घोसाळकरांचे प्रस्थ कमी केले. विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर तर त्यांचे विभागप्रमुख पदही गेले. तरी मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळासाठी पुत्राला उमेदवारी मिळवून देण्यात त्यांना यश आले. उमेदवारी पदरात पडावी म्हणून एका महिला पदाधिकाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामाही दिला होता. अखेर त्यांच्या समर्थकांना उमेदवारी देत ‘मातोश्री’ने ही आगळीच रणनीती आखली.
या निवडणुकीची तारीख आम्हाला माहीत नव्हती. त्यामुळे पालिका सभागृहाची या महिन्यातील पहिली बैठक ५ मे रोजी आयोजित करण्यात आली. महिन्यातील पहिली सभा नियमानुसार रद्द करता येत नाही. त्यामुळे सभागृहाची बैठक घ्यावीच लागली, असे सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

ठाणे मध्यवर्ती जिल्हा बँक निवडणुकीचा उद्या निकाल
ठाणे : महिनाभरापासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (टीडीसीसी) निवडणुकीकरिता मंगळवारी ९४.५६ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीचे सहकार पॅनेल आणि बहुजन विकास आघाडी आमने-सामने उभे ठाकले आहेत. त्यामुळे या बँकेवर कोणत्या पॅनलचे वर्चस्व रहाणार, हे गुरुवारच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
या बँकेवर स्थापनेपासून काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व वाढल्याचे चित्र होते. लोकसभा  निवडणुकीपुर्वी जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीमधील काही बडय़ा नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यामध्ये बँकेतील विद्यमान संचालकांचाही समावेश आहे. या पाश्र्वभूमीवर या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र पॅनल उभे केले. बँकेच्या २१ पैकी १० संचालकांची यापुर्वीच बिनविरोध निवड झाली आहे.