भाजपशी युती केली, तर ती स्वाभिमानाने करू, लाचार होऊन मागे जाणार नाही, असा खणखणीत इशारा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईसह नऊ महापालिका निवडणुका स्वबळावर जिंकण्याचे आवाहन शिवसेना कार्यकर्त्यांना करीत ‘एकला चलो’ चेच संकेत दिले. विधानसभेच्या वेळी वेळ कमी पडला, पण भविष्यात शिवसेनेची एकहाती सत्ता आणून दाखवीन, अशी ग्वाहीही ठाकरे यांनी दिली. उत्तर प्रदेशात हिंदूवर अत्याचार होत असताना तुम्ही काय दुर्बीण घेऊन बसला आहात का, असा सवाल करीत केंद्रात सत्ता असताना कुणाची अशी हिंमतच कशी होते, असे म्हणत ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली.

महापालिका निवडणुकांसाठीही युती होईल की नाही, मला माहीत नाही. आम्हाला युती करायची आहे. पण लाचार होऊन वेडीवाकडी युती करणार नाही, असा सणसणीत इशारा ठाकरे यांनी दिला.   शिवसेनेच्या ५० वर्षांच्या वाटचालीत २५ वर्षे भाजपशी युतीमध्ये गेली. हिंदूत्वाची मते फुटू नयेत, या वेडय़ा आशेपायी महाराष्ट्रात युती केल्याने अन्य राज्यांत शिवसेना कधी ताकदीने लढलीच नाही किंवा तिथे कधी ताकद वाढविली नाही, याविषयी खंत व्यक्त करीत पक्षाच्या वाटचालीचे याबाबतही सिंहावलोकन केले पाहिजे, असे ठाकरे यांनी नमूद केले. ‘वाघाची ताकद मुंबईत राहिली नाही, ’ या भाजप नेते प्रकाश मेहता यांच्या टिप्पणीचा संदर्भ  देत ठाकरे यांनी ‘वाघ हा एकटाच असतो, कळपाने रहात नाही,’ असा टोला लगावला. वाघ हा मागेपुढे न पाहता पुढे जातच रहातो, असे स्पष्ट करीत मला दोन्ही प्राणी आवडतात, वृथा वाद नको, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली.

शिवसेनेने केवळ सरकारविरोधात टीका करण्याची भूमिका घेतलेली नसून मराठवाडय़ात व अन्यत्रही दुष्काळग्रस्तांना पक्षपातळीवर मदत केली आहे.

आरोग्य, शिक्षण, पाणी, सामुदायिक विवाह अशा अनेक माध्यमातून आणि सत्तेचा वापर जनतेसाठी करून मदत केली असल्याचा उल्लेख ठाकरे यांनी केला.

उत्तर प्रदेशात कैराना येथे हिंदूवर अत्याचार होऊच कसे शकतात, काश्मिरी पंडितांना न्याय का मिळत नाही, असे सवाल करीत मोदी सरकारवर टीकेची झोड उठविली. अयोध्येत बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेनंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्याचे ठामपणे समर्थन केले. मुंबईतील दंगलींच्या वेळी शिवसेनेचा वाघच जनतेसाठी धावून गेला. राममंदिराच्या मुद्दय़ावरून देशभरात लोक पेटून उठले होते. राममंदिर बांधले जाईल, समान नागरी कायदा आणला जाईल, अशा घोषणा झाल्या. पण आता भाजपचे सरकार सत्तेत असूनही काहीच होत नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

देश बदलत आहे, घोषणा फसवी

देश बदलत आहे, ही भाजपची घोषणा फसवी असल्याची टीका करीत देशातील परिस्थिती आहे तशीच आहे. पाकिस्तान, चीन सीमेवरील परिस्थिती बदललेली नाही.

महागाई वाढत आहे. ‘अच्छे दिन’ माहीत नाही, किमान समाधानाचे दिवस तरी यावेत, अशी अपेक्षा व्यक्त करीत ठाकरे यांनी भाजपला खडे बोल सुनावले.

ठाकरे उवाच

* शिवसेनेने अनेक लाटा झेलल्या, लाटेमध्ये ओंडकेही तरंगतात आणि लाट गेल्यावर गोटे उघडे पडतात

* केंद्र व राज्यात भाजपबरोबर सत्तेत असलो तरी मी सत्यच बोलणार. हिंदूत्वासाठीच भाजपशी युती केली आहे

* सत्ताबदल होत असताना अपशकुन नको, म्हणून राज्यात भाजपला पाठिंबा

* दिल्लीश्वरांना नमविल्याबद्दल ममता बॅनर्जी व बंगाली बाबूंना धन्यवाद. मोदींच्या परदेश दौऱ्यांवरूनही टीका