मुख्यमंत्र्यांकडून ‘सन्माना’ची शिष्टाई

छत्रपती शिवरायांच्या स्मारक भूमिपूजन कार्यक्रमास मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पुणे मेट्रोच्या भूमिपूजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत व्यासपीठावर सन्मानाने बसविण्यात येईल. या दोघांनीही भूमिपूजन समारंभास येण्याचे मान्य केले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. मात्र राजशिष्टाचाराची अडचण असल्याने ठाकरे यांना मोदी यांच्याशेजारचे आसन मिळणार नसल्याने ठाकरे यांना अन्य आसन दिले जाईल. मेट्रो तीन प्रकल्पातून निर्माण होत असलेल्या प्रश्नांमुळे शिवसेनेचा तीव्र विरोध असताना मेट्रो प्रकल्पांच्या भूमिपूजनास ते जाणार असल्याने शिवसेनेच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुणे मेट्रोसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना व्यासपीठावर स्थान दिल्यास आणि ठाकरे यांना मुंबईत व्यासपीठावर आमंत्रित न केल्यास शिवसेनेचा रोष होईल. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीदरबारी शिष्टाई करून तोडगा काढल्याचे समजते.

पंतप्रधान मोदी २४ डिसेंबरला मुंबईत येत असून मुंबईत छत्रपती शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारक, मेट्रो प्रकल्पांचे काही टप्पे यांचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे सरकार शिवसेनेच्या पाठिंब्यावर राज्यात सत्तेवर असल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा योग्य सन्मान राखला गेला पाहिजे, असा शिवसेनेचा आग्रह आहे. मुंबई विमानतळावरच्या शासकीय समारंभात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शेजारचे आसन दिले होते; पण इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन समारंभात ठाकरे यांना राजशिष्टाचाराचे कारण देत व्यासपीठावर स्थान नाकारल्याने शिवसेनेने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर शासकीय समारंभात ठाकरे यांचा योग्य सन्मान राखण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेच्या नेत्यांना दिले होते. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाकरे यांना मोदी यांच्याशेजारचे आसन देण्याची मागणी विधानसभेत केली होती.

स्मारकाच्या भूमिपूजनाबरोबरच मेट्रो प्रकल्पांचे भूमिपूजनही मोदींच्या हस्ते होणार असून शिवसेनेने मेट्रो तीनला विरोध केला आहे. शिवसेनेचा प्रकल्पाला विरोध नाही; पण आरेच्या जागेतील कारशेडमुळे झाडांची कत्तल होणार आहे, तर गिरगावमध्ये प्रकल्पबाधितांना पर्यायी घरे देण्याचा प्रश्न आहे. तरीही शिवसेनेच्या विरोधाला न जुमानता या टप्प्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मोदी यांच्या हस्ते स्मारकाबरोबरच मेट्रो प्रकल्पांचेही भूमिपूजन होत असून वांद्रे-कुर्ला संकुलात सभा होणार आहे. महापालिका निवडणुका लक्षात घेता भाजपकडून या वेळी शक्तिप्रदर्शन करण्यात येईल आणि स्मारकासह मेट्रो प्रकल्पांचे श्रेय घेतले जाईल. शिवसेनेच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना फारसे स्थान राहणार नाही.  पुणे मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन करताना पवार यांना व्यासपीठावर आमंत्रित करण्याचा राष्ट्रवादीचा आग्रह होता. पवार आणि मोदी यांच्यात स्नेहसंबंध असल्याने राजशिष्टाचार बाजूला ठेवून पवार यांना व्यासपीठावर स्थान देण्यास मोदी यांनी मान्यता दिली. ठाकरे यांनी नोटाबंदीच्या मुद्दय़ासह मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. पण पवार यांना पुण्यात व्यासपीठावर स्थान दिल्यास आणि ठाकरे यांना मुंबईत तसे न दिल्यास ठाकरे चिडतील, यामुळे त्यांना आमंत्रित करण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.