देशातील प्रत्येक राज्यातील नागरिकांना आपल्या प्रादेशीक भाषेचा अभिमान आहे. त्याप्रमाणे उर्दू भाषेलाही मानाचे स्थान असून ही धर्माची भाषा नसून सर्वसामान्यांची भाषा आहे, असे प्रतिपादन देशाचे ऊपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी शनिवारी भिवंडी येथे केले. ऊर्दू भाषेत एक वेगळा गोडवा आहे. त्यामुळे सर्व देशवासियांनी तिचा सन्मान करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कोकण मुस्लिम एज्युकेशन सोसायटी अंतर्गत असलेल्या जी.एम.मोमीन गर्ल्स महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षांनिमीत्ता आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय उर्दू महासंमेलासाठी अन्सारी उपस्थित होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास राज्यपाल के.शकर नारायण, ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक, शिक्षण राज्यमंत्री फौजीया खान आदी मान्यवर उपस्थित होते. देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये उर्दू भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा तसेच उर्दू भाषेच्या उन्नती आणि प्रगतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या समेलनाच्या निमीत्ताने यावेळी एका उर्दू वेबसाईटचा शुभारंभही करण्यात आला. १९४७ नंतर उर्दू भाषेबद्दल देशातील काही भागांमध्ये नकारात्मक भूमीका होती. तरीही या भाषेने आपले अस्तित्व टिकवून ठेवले. काही भागात या भाषेला दुर्लक्षीत केले गेले. महाराष्ट्राने मात्र उर्दूचा नेहमीच सन्मान केला आहे, असे अन्सारी यावेळी म्हणाले. या भाषेच्या प्रचारासाठी वेगवेगळ्या शिक्षण संस्थांनी, शिक्षकांनी तसेच पालकांनीही पुढाकार घ्यावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. या भाषेत संभाषण करुन पहा. समोरची व्यक्ती तुम्ही लगेच आपलीशी कराल, असेही ते यावेळी म्हणाले.