महापालिकेने दोन वर्षांपूर्वी वाकोला मनपा शाळेच्या रिकाम्या केलेल्या भागातील सज्जा शुक्रवारच्या मुसळधार पावसात कोसळला. या घटनेत कोणीही जखमी झालेला नसला तरी धोकादायक स्थितीत उभ्या असलेल्या इमारतींची समस्या पुन्हा समोर आली आहे.
दहिसर येथील रिकामी केलेली इमारत २२ जून २०१३ रोजी कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर धोकादायक ठरवून रिकामी करण्यात आलेल्या इमारती तात्काळ पाडण्याचा फतवा पालिकेने जारी केला होता.
वाकोला महानगरपालिका शाळेतील एक भाग धोकादायक असल्याने दोन वर्षांपूर्वीच रिकामा करण्यात आला होता. धोकादायक इमारतीचा भाग कुंपण घालून वेगळा करण्यात आला होता. मात्र, रात्रभर कोसळणाऱ्या पावसात इमारतीच्या सज्जाचा भाग शुक्रवारी खाली कोसळला. या भागात विद्यार्थी नसल्याने कोणीही जखमी झाले नाही. मात्र उर्वरित इमारतीत पहिली ते सातवी मराठी व उर्दू माध्यम तसेच पहिली ते दहावी रात्रशाळेसाठी सुमारे दोन हजार विद्यार्थी येतात.
‘धोकादायक भागाची पुनर्बाधणी व उर्वरित इमारतीची दुरुस्ती एकाच वेळी करायची असल्याने दोन वर्षे हा भाग पाडण्यात आला नाही,’ असे स्पष्टीकरण शिक्षण समितीचे अध्यक्ष विनोद शेलार यांनी दिले. मात्र धोकादायक इमारती तात्काळ पाडण्याचा आपलाच निर्णय पालिका विसरल्याचे या घटनेवरून दिसून आले.
पालिका शाळा धोकादायक असल्याचे हे एकच उदाहरण नाही. पालिकेच्या १४० शाळांची पाहणी करण्याचे ठरले होते. त्यापैकी ७६ इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट आले आहे. यापैकी ७५ इमारतींची दुरुस्ती सुचवण्यात आली असून काजूपाडा मनपा शाळा, बोरिवली, असल्फा व्हिलेज शाळा, कुर्ला व बाबूराव जगताप मार्ग शाळा, भायखळा या तीन इमारती पाडण्यास सांगण्यात आले आहे. या तिन्ही इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. मात्र त्या पाडण्याचे काम आता पावसाळ्यानंतरच होऊ शकेल.