गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवादरम्यान रोषणाईसाठी मंडळांकडून सर्रास वीजचोरी होत असल्याने तिला आळा घालण्यासाठी पोलीस आणि ‘बेस्ट’च्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेले त्रिसदस्यीय विशेष दक्षता पथक स्थापन करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या पाश्र्वभूमीवर या पथकाची स्थापना झाली आहे. फेरीवाल्यांकडून वीजचोरी केली जात असल्याची दखल घेत या प्रकारांना आळा घालण्यासाठी उच्च न्यायालयाने विशेष दक्षता समिती स्थापण्याचे आदेश दिले होते. तसेच वीजचोरीच्या प्रकरणी आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याचेही स्पष्ट केले होते. हा आदेश गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवादरम्यान रोषणाईसाठी चोरी करणाऱ्या मंडळांना लागू करा, अशी मागणी केतन तिरोडकर यांनी जनहित याचिकेद्वारे केली होती. याचिकेमध्ये गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवादरम्यान होणाऱ्या चोरीच्या प्रमाणाचा तपशीलही तिरोडकर यांनी सादर केला होता. त्याची दखल घेत पोलीस आणि ‘बेस्ट’ यांना बैठक घेऊन विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे.