मुंबई शहरात दरदिवशी वाया जाणारे पाणी हे ठाणे व नवी मुंबईला दरदिवशी लागणाऱ्या एकूण पाण्यापेक्षा अधिक आहे. अनधिकृत जोडण्या आणि गळती यामुळे शहरातील सुमारे २५ ते ३० टक्के पाणी वाया जात असून ही स्थिती केवळ मुंबईची नाही. पुण्यातही पाणीगळतीचा प्रश्न वर्षांनुवष्रे अनुत्तरित राहिला आहे. एकीकडे एका हंडय़ासाठी मलोनमल चालावे लागत असताना हजारो लिटर पाणी वापराविना वाया जात आहे.
मुंबई शहराला ठाणे व नाशिक येथील तलावांमधून पाणीपुरवठा होतो, तर पुण्यात खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांमधून पाणी आणले जाते. धरणातून बाहेर पडलेले पाणी व प्रत्यक्षात घरांमध्ये पोहोचलेले पाणी यात सुमारे ३० ते ४० टक्क्यांचा फरक पडतो. मुंबईत दिवसाला ३७५० दशलक्ष लिटर पाणी पुरवले जाते. यातील ३० टक्के म्हणजे साधारण ११२५ दशलक्ष लिटर पाणी नेमके कुठे जाते त्याचा पत्ता लागत नाही. पुण्यातही रोजच्या ११८० दशलक्ष लिटर पाण्यापकी सुमारे ४०० दशलक्ष लिटर वाया जाते. महत्त्वाचे म्हणजे ठाणे शहरात दिवसाला ४५० दशलक्ष लिटर, तर नवी मुंबईला ४७५ लिटर पाणी पुरवले जाते. या दोन्ही शहरांच्या एकूण पाणीसाठय़ापेक्षा मुंबईची पाणीगळती अधिक आहे.
एवढय़ा मोठय़ा प्रमाणात होत असलेली पाण्याची तफावत मुख्यत्वे दोन कारणांनी होते. अनधिकृत जोडण्या आणि पाणीगळती. अनधिकृत जलजोडण्यांमधून वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे शुल्क पालिकेला मिळत नसले तरी हे पाणी किमान वापरले जाते. पाणीगळती ही त्याहूनही मोठी समस्या आहे.
तलावातून शहरात पाणी आणण्यासाठी टाकण्यात आलेल्या जलवाहिन्या शंभर ते दीडशे वर्षे जुन्या आहेत. याशिवाय शहराअंतर्गत पाणीपुरवठय़ासाठीही पालिका अजूनही जुन्या जलवाहिन्यांवर अवलंबून आहेत. या जलवाहिन्या जमिनीखालून नेमक्या कुठून कुठे जातात याची कोणतीही कागदोपत्री माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे या जलवाहिन्या दुरुस्त करणे त्रासदायक ठरत आहे. त्यापेक्षाही ही दुरुस्ती करणे अत्यंत खíचक आहे.
मुंबई पालिकेने जलवाहिन्या दुरुस्त करण्यापेक्षा जलबोगदे तसेच नवीन जलवाहिन्या टाकण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र त्यासाठी लागणारा खर्च तसेच कामाचा वेग पाहता सध्या सुरू असलेली ३० टक्के पाणीगळती नजीकच्या वर्षांमध्ये कमी होण्याची चिन्हे नाहीत.

शहरातील ३० टक्के पाणीगळतीचे काय ?
* मुंबईत रोज पुरवले जाणारे पाणी – ३७५० दशलक्ष लिटर
* वाया जाणारे पाणी – सुमारे ११२५ दशलक्ष लिटर
* पुणे – ११८० दशलक्ष लिटर
* वाया जाणारे पाणी – सुमारे ४०० दशलक्ष लिटर