वांद्रे येथील दफनभूमीच्या वादामुळे प्रकल्प रखडलेलाच; सहाव्या मार्गिकेचे कामही पाचव्या मार्गिकेबरोबरच

पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गाची क्षमता वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प वांद्रे स्थानकाजवळ येऊन रखडला आहे. या पकी पाचव्या मार्गिकेचे काम सांताक्रुझ ते वांद्रे या दरम्यान पूर्ण झाले आहे. पण वांद्रे स्थानकाच्या उत्तरेकडे रेल्वेच्या हद्दीत असलेल्या दफनभूमीमुळे हा मार्ग पुढे येण्यास अडथळा निर्माण झाला आहे. यावर रेल्वे प्रशासनाने सुचवलेले सर्व तोडगे निष्फळ ठरल्यानंतर आता या दफनभूमीवर उड्डाणपूल बांधण्याचा विचार पश्चिम रेल्वे करत आहे. हा उड्डाणपूल बांधल्यानंतर मग पाचव्या माíगकेबरोबरच सहाव्या माíगकेचेही काम करण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर सध्या १३००हून अधिक सेवा चालवल्या जातात. मुंबई विभागात मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस या दोन्ही टर्मिनसमधून दिवसाला अनेक लांबपल्ल्याच्या गाडय़ा बाहेर पडतात. या गाडय़ा उपनगरीय मार्गावरच धावत असल्याने मुंबईच्या उपनगरीय सेवांमध्ये वाढ करणे पश्चिम रेल्वेला शक्य होत नाही. त्यावर तोडगा म्हणून पश्चिम रेल्वेवरही पाचव्या व सहाव्या माíगकेचे काम हाती घेण्याचे नियोजन केले आहे. त्यापकी सांताक्रुझ ते वांद्रे यांदरम्यान पाचव्या मार्गिकेचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे.

वांद्रे स्थानकाच्या उत्तरेकडे असलेल्या एका मुस्लीम दफनभूमीकडे जाण्याचा रस्ता रेल्वेच्या हद्दीतून जात असल्याने स्थानिकांनी या पाचव्या मार्गिकेला विरोध केला होता. रेल्वे प्रशासनाने या स्थानिकांना अनेक पर्यायही सुचवले होते. मात्र स्थानिकांनी प्रत्येक पर्याय नाकारल्याने हे काम रखडले होते. त्यात अनेक लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करूनही हा प्रश्न सुटला नाही. परिणामी पाचव्या माíगकेचे काम अवघड झाले आहे.

आता पश्चिम रेल्वेने या मार्गिकेसाठी उड्डाणपुलाचा पर्याय सुचवला आहे. हा उड्डाणपूल वांद्रे स्थानकाच्या उत्तरेकडून खार स्थानकाच्या दक्षिणेपर्यंत असेल. तो दफनभूमीच्या वरून जाणार असल्याने त्या उड्डाणपुलाखालील जागेतून स्थानिकांना दफनभूमीकडे जाण्यासाठीचा मार्ग उपलब्ध करून देता येणार आहे.

या उड्डाणपुलासाठी किती खर्च येईल, त्यासाठी किती जागा लागणार आहे, याचा अभ्यास आता पश्चिम रेल्वे करणार आहे. त्याचप्रमाणे हे काम पूर्ण झाल्यानंतर पाचव्या माíगकेबरोबरच सहाव्या माíगकेचेही काम हाती घेण्यात येईल.

हवेत विस्तार करणार का?

विशेष म्हणजे मध्य रेल्वेवर कुर्ला स्थानकात हार्बर मार्गाचे दोन प्लॅटफॉर्म उन्नत उभारण्याची योजना आहे. त्यासाठी कुर्ला स्थानकातही रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचे काम प्रस्तावित आहे. त्यामुळे आता जमिनीवर जागा उपलब्ध नसल्याने रेल्वे हवेत विस्तार करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.