भावा-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण साजरा करून ठाण्यात परतत असलेल्या महिलेला रेल्वेमार्गावरील भुरटय़ा चोरांमुळे नाहक जीव गमवावा लागल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. शैला ओंकार शिंपी (५३) असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने शैला माहेरी गेल्या होत्या. मंगळवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास अमृतसर एक्स्प्रेसने त्या कळव्याला परतत होत्या. ठाणे स्थानकात शिरण्यापूर्वी एक्स्प्रेस गाडय़ांचा वेग कमी होतो. ही संधी साधून विटावा पुलावर उभे राहून भुरटे चोर एक्स्प्रेस गाडय़ांच्या दरवाजातील प्रवाशांच्या सामानाची चोरी करतात. दरवाजाजवळ उभ्या असलेल्या शैला शिंपी यांच्याकडील पर्स चोरण्याचा प्रयत्न त्यातील एकाने केला. शैला यांनी चोराला जोरदार प्रतिकार केला. यावेळी झालेल्या झटापटीत शैला रेल्वेमार्गावर पडल्या. त्यांच्या डोक्याला जबर मार बसला. त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच शैला यांचे निधन झाले.