नागपूरमध्ये महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असून या महिन्यात घडलेल्या तीन प्रकरणांमध्ये पोलिसांनी दखल घेण्यास विलंब केला आणि आरोपींना मदत होईल, असे वर्तन केल्याची तक्रार शिवसेना आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. गृहखातेही मुख्यमंत्र्यांकडे असताना महिला अत्याचारांच्या घटनांबद्दलही पोलीस गंभीर नसल्याचे दाखवून डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांना ‘घरचा आहेर’ दिला आहे.
सीताबर्डी आणि इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मार्चमध्ये तीन गुन्ह्य़ांची नोंद विलंबाने करण्यात आली आणि तक्रारदारांनाच त्रास देण्यात आला. इमामवाडा  क्षेत्रात तडीपार गुंड प्रकाश बागडे याने  मुलीचा विनयभंग केला. त्याला वाचविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. याच हद्दीतील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणाने ११-१२ वर्षांच्या चार मुलींचे लैंगिक शोषण केले. त्याच्याबरोबर आणखी एक मुलावर संशय असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले.