लेखिका, लोकसंस्कृती व लोकसाहित्याच्या संशोधक, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, बौद्ध धर्म यांच्या अभ्यासक दुर्गाबाई भागवत यांची ओळख फडर्य़ा वक्त्या अशी नाही. मात्र लेखन आणि विचारस्वातंत्र्याच्या झुंजार पुरस्कर्त्यां म्हणून त्या ओळखल्या जातात. आणीबाणीच्या काळात त्यांनी केलेल्या भाषणांचे संकलन ‘मुक्ता’ व ‘जनतेचा सवाल’ या पुस्तकांत करण्यात आले आहे. ६ डिसेंबर १९७५ रोजी कऱ्हाड येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्या भाषणाचा हा संपादित भाग.

पारतंत्र्याच्या त्या काळात लेखकाला जेवढी प्रतिष्ठा होती, तेवढी नंतर राहिलेली नाही. सुरक्षिततेचा आभास निर्माण झाला. पैसा जास्त मिळतो. सरकारदरबारी मानाची स्थानं, पारितोषिकं मिळतात. किताबही मिळतात; पण वैचारिक क्षेत्रात, जनमानसात लेखकांना अधिकारित्व राहिलेले नाही. कारण या परिस्थितीत स्वत्वाची कसोटी लेखकाला स्वत:लाच आवश्यक वाटत नाही. स्वातंत्र्यानंतर कल्पकतेला व साहित्यगुणांना वास्तविक फार मोठा उठाव मिळायला हवा. जनता संपर्काची साधनं आता अधिक प्रमाणात उपलब्ध झाली. यातून जनतेच्या अभिरुचीचा विविध अंगांनी विकास करून नवनवी कला व ज्ञानक्षेत्रं यांचा वाढता परिचय लोकांना घडविण्यासाठी, स्वत:ची प्रतिभा आणि ज्ञानमान वाढविण्यासाठी झटण्याचा प्रयत्न करण्याऐवजी अनेक                                                               

थोर लेखकांनी व विचारवंतांनी रेडिओ, टीव्ही व इतर जनता माध्यमांचा वापर करताना त्यासाठी काही मूल्यं, कसोटय़ा नि मानदंड यांचा त्याग करणं अपरिहार्य आहे अशी समजूत करून घेऊन स्वत:ची मूळ पातळी मात्र गमावलेली आढळते.  
लेखकाचं समाजाच्या जडणघडणीत काय स्थान आहे हे त्याच्या अस्मितेवर आणि त्याचं समाजमनाशी जे ताद्रूप्य घडतं, त्यावरच अवलंबून असतं. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी लेखक हा एक प्रकारे वैचारिक अधिष्ठाता समजला जात असे. नेत्याचं भाग्य त्याला लाभत असे. खांडेकर, फडके वगैरेंच्या सभांना राजकीय सभांसारखीच गर्दी व शान असे; पण आता हे मानिबदू ढळल्याचं दिसतं. तत्काळ धनप्राप्ती, प्रसिद्धी आणि प्रसार यांना लेखकही सहज वश होतो आणि निखळ लेखनाचं जुनं तंत्र बाजूला ठेवून तो इतर प्रसंगीही या तंत्रांच्या चौकटीतच फार खोलवर न जाता, त्यांच्या विषयाच्या व आशयाच्या मर्यादा जणू त्याच दूरवर परिणाम करणाऱ्या आहेत असा समज करून घेऊन चुरचुरीत भाषा, थोडी करुणा, थोडा विनोद, माहितीचे अपुरे तुकडे वगैरेंचा एक रंगीन आकृतिबंध निर्माण करून लोकांचं रंजन करतो. त्याची भूमिका विचारवंतापेक्षा, कलावंतापेक्षा रंजकाची होऊन बसते.  
साहित्याला दुय्यम कलेचं स्थान येऊ न देण्याचं एक रहस्य आहे. ते म्हणजे लेखकाचं लोकांची बोलीभाषा आत्मसात करण्याचं कसब.
बोलीभाषा सदैव अस्तित्वात असते आणि बोलीतले प्रयोग वाङ्मयाला ताजेपणा आणतात आणि संवादसूत्र साधतात. मराठीत व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, आनंद यादव वगैरे अनेक लेखकांना जे यश मिळालं, ते याच बोलीभाषेच्या आत्मसातीकरणामुळे. या परिस्थितीत स्वत:च्या इमानाला जपणाऱ्या विचारवंताची स्वत:ला या लोकप्रिय माध्यमाच्या करवी सत्तास्पर्धेकडे खेचू न दिल्यामुळे काय स्थिती होते, ती ‘लोकांचा पाठिंबा नसलेल्या मूठभर विद्वानांना विचारतो कोण’? अशा बिरुदानंही होते; पण हे खरं नाही. या मूठभरांचाच वचक सताधाऱ्यांना वाटतो.
विशिष्ट किंवा प्रमाण अगर लेख्य भाषा हीच काय ती सौंदर्यपूर्ण व अभिव्यक्तीसाठी उचित भाषा आणि बोलीभाषा अगर ग्रामीण भाषा ही अभिव्यक्तीला कमीपणा आणणारी भाषा असं आजही काही संस्थांच्या व्यासपीठांवरून बोललं जातं, ते पाहून आश्चर्य वाटतं. शिष्ट भाषा व बोलीभाषांचं अभिसरण साहित्यिक वातावरणाला पोषक आहे, मारक नाही. शिष्ट भाषादेखील सदैव बदलत असते. बदल हाच भाषेचा स्वाभाविक धर्म आहे.    
मानवाला अनेक दु:खं भोगावी लागतात. अनेकांची दु:खं मुकी, पण खोल असतात. त्यांना वाचा देणं हेच साहित्यिकाचं कार्य असं कामू म्हणतो; परंतु आपल्याकडे साहित्यिकांनी अशा प्रचंड दु:खांना वाचा पुरवली नाही. त्यांना वाचा दिली ती महात्मा गांधींनी व तीही राजकीय पाश्र्वभूमीवर. तेव्हापासून आमच्याकडे राजकारण आणि साहित्य यांचं कार्य अतूट झालं आहे. म्हणूनच साहित्य हे आता राजकारणापासून तोडता यायचं नाही. परस्परसंबंध व सामंजस्य हे दोन गुण अशा साहित्याचं व्यवच्छेदक लक्षण समजले पाहिजे.
तेव्हा सांगायचा मुद्दा असा की, भारतातल्या लेखकाला लेखनावर जगण्यासारखी परिस्थिती अजून आलेली नाही. बहुसंख्य लेखकांना जगण्यासाठी दुसरे साहित्योत्तर उद्योग करणं भागच पडतं. हे तर मोठंच बंधन त्यांच्यावर कायमचं आहेच. त्यांनी आणखी बंधनं लादून घेणं उचित नाही. तसं झालं तर त्यांच्या अस्तित्वाचाच लोप होईल.
निर्माणकाराने संकटांबरोबर झुंजताना तडजोड केली, तर भौतिक स्वास्थ्य त्याला मिळेल. कदाचित मानसिक निर्धास्तपणा मिळेल; पण निर्मिती कोंडून पुढच्या पिढय़ांच्या भवितव्याचीच हानी तो करील.
संकलन – शेखर जोशी

नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइस व भारतीय आयुर्विमा मंडळ यांच्या सहकार्याने आणि जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड व तन्वी हर्बल्स यांच्या मदतीने राज्यातील आठ केंद्रांवर झालेल्या ‘लोकसत्ता’ वक्तृत्व स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी आहे.