मुंबईत उत्साहाने मतदान सुरू झाल्याचे चित्र गुरुवारी सकाळी समोर आले आणि मोदी लाटेचा प्रचार हिरिरीने चालवणारी तरुणाई मतदानासाठी भरभरून उतरणार ही अपेक्षा उंचावली. तरुणाई मतदानाला उतरलीही.. पण नेहमीसारखीच. ‘अब की बार मोदी सरकार’ची मोहीम सोशल मीडियावर राबवण्यात असलेला उत्साह त्या प्रमाणात मतदान केंद्रांवर दिसला नाही आणि तरुण मतदारांच्या भरभरून मतदानाच्या अपेक्षाचा फुगा फुटला.
देशातील राजकारणात बदल घडवण्याची भाषा गेल्या काही काळात तरुणाईने व्हॉट्स अप, फेसबुकसारख्या सोशल मीडियावरून जोरात सुरू केली. निवडणुकीचा हंगाम सुरू झाल्यानंतर तर या सोशल मीडियावर ‘परिवर्तन चळवळ’च जणू सुरू झाली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची खिल्ली उडवणारे आणि त्याचवेळी राज ठाकरे, नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्यांना ‘आयकॉन’ म्हणून ठसवणारे संदेश जोरात फिरू लागले. रस्त्यापेक्षा सोशल मीडियावरील प्रचाराचा वाढता प्रभाव पाहून एरवी साध्या वृत्तवाहिन्यांकडेही तुच्छतेने पाहणारी नेतेमंडळी तरुणाईला आपलेसे करण्यासाठी सोशल मीडियावरील प्रचाराबाबत जागरूक झाली. तरुणाई यावेळी मतदानावर मोठा प्रभाव पाडणार, तरुणांच्या झुंडीच्या झुंडी मतदानासाठी उतरणार असे वातावरण निर्माण झाले होते.
मुंबईत तर मोबाइल फोनवरील ‘व्हॉट्स अ‍ॅप’पासून फेसबुकपर्यंतच्या सोशल मीडियाचा प्रचंड सुळसुळाट असल्याने मुंबईत मतदारांच्या रांगांमध्ये तरुणांची संख्या प्रचंड असणार अशी अपेक्षा निर्माण झाली होती. पण प्रत्यक्षात मुंबई-ठाण्यातील मतदानाचे चित्र पाहता तरुणाई मतदानासाठी उतरली पण नेहमीसारखीच. सोशल मीडियावरील तरुणाईची तडफ मतदान केंद्रांवर दिसली नाही. त्यामुळे तरुणाईच्या उत्साहाचा बुडबुडा फुटल्याचे चित्र दिसले. तरुणाईने जितका उत्साह सोशल मीडियावरील चर्चेत दाखवला तितकाच मतदानात दाखवला असता तर मुंबईत मतदानाच्या टक्केवारीने साठीचा आकडा ओलांडला असता अशी चर्चा आहे.