भाजप व काँग्रेसपुढे आव्हान

निवडणुकीच्या तोंडावर पक्षात प्रवेश घेणाऱ्यांमुळे भाजप आणि काँग्रेसमधील जुने कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून त्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी यादी जाहीर होण्यापूर्वीच बंडाचे इशारे देणे सुरू केले आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचे मोठे आव्हान या दोन्ही पक्षांपुढे आहे.

गेल्या निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्ष म्हणून निवडून आलेल्या बंडखोरांना भाजपने जवळ करून उपमहापौर आणि इतर पदे दिली. यंदा त्यांच्या पक्षाकडे इच्छुकांची गर्दी झाली आहे. काँग्रेससाठी बंडखोरी नवीन नाही, परंतु मागील निवडणुकीत बंडखोरीत भाजपही मागे नसल्याचे दिसून आले होते. भाजपचे अधिकृत उमेदवार मुन्ना यादव यांच्या विरोधात भाजपचे माजी नगरसेवक सुभाष अपराजित यांनी निवडणूक लढवली होती. याशिवाय भाजपचे अधिकृत उमेदवार गिरीश देशमुख यांच्या विरोधात संघ परिवारातील गिरीश जोशी यांनी दंड थोपटले होते.  आगामी निवडणुकीसाठी भाजपकडे उमेदवारी मागणाऱ्यांच्या संख्येने जुने सर्व विक्रम मोडले आहे. काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुकांच्या संख्येच्या जवळपास दुप्पट अर्ज प्राप्त झाले आहे. त्याबरोबर गेल्या निवडणुकीत काही अपक्ष आणि इतर पक्षातील नगरसेवकांना नागपूर विकास आघाडीच्या माध्यमातून भाजपने आपल्या गोटात ओढले. त्या विद्यमान नगरसेवकांना देखील उमेदवारी देणे क्रमप्राप्त आहे. याशिवाय लोकसभा निवडणुकीत काही अपक्ष नगरसेवकांना तसेच त्या-त्या भागातील प्रमुख कार्यकर्त्यांना महापालिकेच्या उमेदवारीचे गाजर दाखण्यात आले होते. त्याबदल्यात त्यांनी भाजपला लोकसभेच्या निवडणुकीत मदत केली होती. त्याचीही परतफेड भाजपला करावी लागणार आहे. याशिवाय आरपीआय (आठवले) आणि बहुजन रिपब्लिकन एकता मंचनेही जागांची मागणी केली आहे. यामुळे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही विद्यमान नगरसेवकांना देखील यावेळी उमेदवारी मिळणार की नाही. याची शाश्वती नाही. ते उमेदवारांची यादी जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. निष्ठावानांना डावलून इतरांना उमेदवारी दिेल्यास एकतर बंडखोरी करायची किंवा विरोधकांना छुपा पाठिंबा द्यायचा अशी भाषा ते वापरू लागले आहेत.  काँग्रेसच्या बाबतीत देखील अशीच स्थिती आहे. गत दहा वर्षे पक्ष सत्तेबाहेर असूनही  पाच विद्यमान नगरसेवक आणि तीन माजी नगरसेवकांनी पक्षात प्रवेश घेतला आहे. साहजिक बाहेरून आलेल्या नगरसेवकांना उमेदवारीचे आश्वासन देण्यात आले असावे. परंतु या आयातीत उमेदवारांमुळे आपली तिकीट कापले जाईल म्हणून काही विद्यमान नगरसेवक आणि निष्ठवान कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. मागील निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरोधात उपमहापौर सतीश होले यांनी बंडखोरी केली होती. ते निवडून आले आणि भाजपात दाखल झाले. मुन्ना पोकुलवार यांनीदेखील काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध निवडूक लढवली आणि विजयी झाले. या दोघांनाही प्रत्येकी दीड वर्षांकरिता भाजपने उपमहापौर बनवले. परंतु यावेळी भाजपकडे तीन हजारावर इच्छुक असून त्यातील १५१ उमेदवार निवडायचे आहेत. अशा परिस्थिती उमेदवारांची छाननी आणि निवड यादी करण्याचे काम सोपे नाही.  उमेदवारी नाकारल्यास गेल्यास सर्व पर्याय खुले ठेवणारे बरेच इच्छुकांच्या यादीत आहेत.