* ‘इकमो’ उपकरणाने अध्र्याहून जास्त जीव वाचवणे शक्य
* हृदय शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. आनंद संचेती यांचे मत
उपराजधानीत प्रत्येक वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने एक हजाराहून जास्त मृत्यू होत असल्याचे वेगवेगळ्या अभ्यासातून निदर्शनास आले आहे. पैकी काही रुग्णांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू होतो. उपचारादरम्यान होणाऱ्या मृत्यूंपैकी ६० ते ७० टक्के रुग्णांचा शहरात ‘इकमो’ उपकरणांची संख्या वाढल्यास जीव वाचणे शक्य आहे. शहरात सध्या केवळ एकच उपकरण आहे, अशी माहिती हृदय शस्त्रक्रिया तज्ज्ञ (सीव्हीटीएस) डॉ. आनंद संचेती यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मध्य भारतातील सर्वाधिक हृदयाशी संबंधित रुग्ण उपचाराकरिता नागपूरला येतात. या रुग्णांना हृदयविराकाचा झटका आल्यास त्यांच्या हृदयासह यकृताचे काम मोठय़ा प्रमाणावर बिघडते. तेव्हा वेळीच या रुग्णांच्या अवयवांना वाचवण्याचे प्रयत्न गरजेचे असतात.
सध्या होणाऱ्या मृत्यूत या अवयवांची गुंतागुंत वाढून होणारे मृत्यू जास्त आहेत. ते नियंत्रणात आणण्याकरिता हल्लीच्या वैद्यकीय उपचार पद्धतीत इकमो उपकरणाला जास्त महत्त्व आहे. या उपकरणाद्वारे हृदयविकाराचा तीव्र झटका आलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येतो. हे उपकरण हृदयाकडे येणाऱ्या रक्ताला शुद्ध करून ते शरीराच्या वेगवेगळ्या भागात पाठवते. या प्रक्रियेने रुग्णाच्या यकृतासह हृदयावरील ताण कमी होऊन ते सुरक्षित राहण्यास मदत होते. गंभीर गटातील रुग्ण या उपकरणावर २१ दिवसापर्यंत राहू शकतो. या काळात डॉक्टरांकडून रुग्णाला तातडीने बरे करण्याकरिता प्रयत्न केले जातात. उपचाराला योग्य प्रतिसाद मिळाल्यास या उपकरणावरून रुग्णाला पुन्हा सामान्य अवस्थेत आणण्यात डॉक्टरांना यश मिळते. मध्य भारतात मोठय़ा संख्येने हृदयरुग्ण असले तरी सध्या हे उपकरण एकाही शासकीय रुग्णालयांत नाही. नागपूरचे न्यू ईरा रुग्णालय वगळता ते इतर खासगी संस्थांमध्येही उपलब्ध नसल्याची माहिती डॉ. संचेती यांनी दिली.
या उपकरणाच्या सहाय्याने रुग्णाला जीवदान मिळते. याचा खर्च जास्त असला तरी शासकीय व इतरही खासगी रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध झाल्यास त्याचा लाभ अधिक रुग्णांना शक्य आहे. पत्रकार परिषदेला डॉ. निलेश अग्रवाल, डॉ. निधीश मिश्रा उपस्थित होते.