वेलकम सोसायटीतील प्रकार; पोलिसांकडे तक्रार

भूमाफिया दिलीप ग्वालबंशीने शेकडो सर्वसामान्य नागरिकांचे भूखंड हडपल्याचे समोर आले असून तो सध्या कारागृहात आहे. मात्र, दिलीप ग्वालबंशीचा भाऊ आणि भाजपचे नगरसेवक जगदीश ग्वालबंशी यांनीही माजी उपमहापौरांचा भूखंड हडपल्याचा प्रकार समोर येत आहे. यासंदर्भात माजी उपमहापौरांनी पोलिसांकडे तक्रार केली असून पोलीस तपास करीत आहेत.

दिलीप ग्वालबंशी, त्याचे कुटुंबीय आणि साथीदारांनी शहरातील विविध गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या मालकीचे भूखंड हडपल्याचा आरोप असून यासंदर्भात त्यांच्यावर जवळपास १६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता मात्र एका माजी उपमहापौरांनीही त्यांचा भूखंड हडपल्याची तक्रार या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) केली. कृष्णकांत परतेकी असे माजी उपमहापौरांचे नाव असून ते ६ नोव्हेंबर १९८९ ते २ फेब्रुवारी १९९० ला या काळात नागपूरचे उपमहापौर होते. परतेकी यांनी दाभा परिसरातील वेलकम सोसायटीत भूखंड खरेदी केला होता. या सोसायटीत एकूण १.२५ एकर जागेवर भूखंड असून त्यापैकी बहुतांश ठिकाणी जगदीश ग्वालबंशी आणि त्यांच्या माणसांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे, असे त्यांच्या तक्रारीत नमूद आहे.

याशिवाय यापूर्वीच वेलकम सोसायटीतील भूखंडधारक शोभा पांडुरंग कोल्हे यांच्या तक्रारीवरून जगदीश ग्वालबंशी आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध भूखंड हडपणे, अडवणूक करणे आणि खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर आता परतेकी आणि इतर तिघांनी केलेल्या तक्रारीनंतर जगदीश ग्वालबंशींच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. यासंदर्भात एसआयटीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांनी अशी तक्रार प्राप्त झाली असून त्याची चौकशी सुरू असल्याचे सांगितले.

मिलिंद सोसायटीतील साडेचारशे भूखंडांची परस्पर विक्री

मौजा बेसा परिसरातील मिलिंद हाऊसिंग सोसायटीमध्ये ५६९ पैकी ४५९ जणांचे भूखंड परस्पर लक्ष्मीरतन बिल्डर्सला विकल्याचीही तक्रार एसआयटीकडे प्राप्त झाली आहे. ५८९ जणांनी मिळून ही सोसायटी स्थाापन केली होती आणि भूखंड खरेदी केले होते. शालिकराम ढोरे हे सोसायटीचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर २००३ मध्ये संदीप जैनी हे सोसायटीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर २००३ ते २००९ या कालावधीमध्ये सदस्य बैठकांना अनुपस्थित राहतात म्हणून ४५९ सदस्यत्व रद्द करून ते भूखंड लक्ष्मीरतन बिल्डर्सना विकले. या प्रकरणात सदस्यांनी ७ एप्रिल २०१७ ला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सोसायटीतील भूखंड विकण्याची शक्यता असून त्यावर रोख लावण्यात यावी, अशी विनंती केली होती. त्यानंतरही १३ एप्रिल २०१७ ला भूखंडांचे विक्रीपत्र करण्यात आले. या प्रकरणात हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या गुन्ह्य़ात आता फसवणुकीच्या कलमाची वाढ करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली.