आठवले यांच्याशी चर्चा करूनच प्रश्न सोडवणार – भूपेश थुलकर
‘रिपाइं’चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रीपदाच्या मागणीकरिता राज्यात पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन पक्षात फूट निर्माण होण्याची शक्यता पुढे आली. त्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या विदर्भस्तरीय बैठकीत शनिवारी एक ठराव मंजूर झाला. त्यात पक्ष फुटणार नाही म्हणून आठवले यांच्याशी चर्चा करून सर्व प्रश्न सोडवण्यावर एकमत झाले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांनी त्यावर पक्षात काहींमध्ये मतभिन्नता असली तरी विचारभिन्नता नसून फूट पडणार नसल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
लोकसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि ‘रिपाइं’(आठवले)सह इतर मित्रपक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली. याप्रसंगी रामदास आठवले यांना राज्यसभेत पाठवून केंद्रीय मंत्रीपद देण्याचे निश्चित झाले होते. परंतु दोन वर्षे लोटल्यावरही त्यांना मंत्रीपद मिळाले नाही.
त्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप आणि सेनेत काही कारणास्तोवर फाटाफूट झाली. याप्रसंगी शिवसेना ऐवजी भाजपशी युती करण्याचा निर्णय पक्षाने घेतला. भाजपने याप्रसंगी पक्षाला काही शब्द देत करार केले होते. त्यानुसार विधान परिषदेत एक जागा रिपाइंला मिळणार होती. परंतु रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रीपद न मिळाल्याने पक्षाकडून दबाव तयार करण्याकरिता ती नकारली.
याप्रसंगी रामदास आठवले हे बांगलादेशात एका कार्यक्रमाकरिता आणि मी प्रदेशाध्यक्ष म्हणून पुण्यात होतो. तेव्हा आमच्यात या विषयावर संवाद न झाल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. पक्षनेते रामदास आठवले यांच्याशी सगळे कार्यकर्ते एकनिष्ठ आहेत. आमच्यामध्ये काही मतभिन्नता असली तरी विचारभिन्नता नाही.
शनिवारी नागपूरला विदर्भस्तरीय झालेल्या पक्षाच्या बैठकीत यावर चर्चा झाली. त्यात आठवले यांच्याशी चर्चा करून सगळे प्रश्न सोडवण्याचा निर्णय झाला. प्रभाग पद्धतीच्या विरोधात पक्षाकडून न्यायालयाचे द्वार ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा प्रकार लहान पक्षाच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले.
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसह पक्ष वाढवण्याकरिता लवकरच विदर्भात यात्रा काढणार असल्याची माहिती याप्रसंगी दिली.
पत्रकार परिषदेला भीमराव बनसोड, आर. एस. वानखेडे, दुर्वास चौधरी, डॉ. भीमराव मस्के, विनोद थूल, भीमराव कांबळे, राजन वाघमारेसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.