सेवानिवृत्त पोलिसाचा भूखंड हडपल्याचे प्रकरण

दिलीप ग्वालबंशीने अनेकांची भूखंड हडपल्याचे प्रकरण ताजे असतानाच काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक हरीश ग्वालवंशी यानेही सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबाराव ढोमणे यांच्यासह इतरांची भूखंड हडपल्याचे ‘लोकसत्ता’ ने पुढे आणले होते. वृत्ताची दखल घेत गिट्टीखदान पोलिसांनी नगरसेवक हरीश ग्वालवंशी, शैलेश ग्वालवंशी यांच्यासह अलोक अशोक महादुले या तिघांवर गैरकायद्याची मंडळी जमावून ढोमणे यांना धक्काबुक्की करत खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

नागपुरात गेल्या काही दिवसांपासून दिलीप ग्वालवंशीने अनेकांचे भूखंड हडपल्याचे प्रकरण गाजत असून पोलिसांकडूनही पूर्ण क्षमतेने तपास करण्यात येत आहे. पोलीस सेवेतून निवृत्त झालेले बाबाराव ढोमणे यांचाही भूखंड हडपण्यात आला आहे. २००२ मध्ये मकरधोकडा परिसरातील नर्मदा हाऊसिंग सोसायटीमध्ये १ हजार ५०० चौरस फुटाचा भूखंड ढोमणे यांनी खरेदी केला होता. या भूखंडावर नगरसेवक हकीश ग्वालवंशीच्या माणसांनी अतिक्रमण करत तो दुसऱ्याला विकला होता. या घटनेमुळे ढोमणे यांच्यावर मंदिरात राहण्याची वेळ आली होती. सर्वप्रथम ‘लोकसत्ता’ने ही बाब पुढे आणली होती.

आपला भूखंड सोडविण्यात यावा आणि मूळ भूखंड मालकांना परत करावा, अशी तक्रार ढोमणे यांनी परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त राकेश कलासागर यांच्याकडे केली होती. तक्रारीत हरीश ग्वालवंशी यांनी सुमारे दोन आठवडय़ापूर्वी धक्काबुक्की केल्याचे व भूखंड हवा असल्यास ७ लाख रुपयांची मागणी केल्याचे नमूद आहे, तर प्लॉट मालक प्रमोद अहिरे यानेही त्यांना पोलिसांत तक्रार दिल्यास बघून घेण्याची धमकी दिली होती. तेव्हा शेवटी नगरसेवक हरीश ग्वालवंशीसह तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.