ज्येष्ठ महिला सामाजिक कार्यकर्त्यांचे मनोगत, ‘लोकसत्ता’च्या वृत्ताचे समर्थन
विद्यार्थिनींना शहराच्या सीमेपासून शहरातील महाविद्यालयांमध्ये येताना सार्वजनिक बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांचाच त्रास जास्त होतो, या ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताचे ज्येष्ठ महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी समर्थन केले असून त्याचवेळी सर्वच ज्येष्ठ नागरिक असे नसतात, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
या संदर्भात लीला चितळे म्हणाल्या, मानवी स्वभाव आणि सामाजिक रचनेत पुरुषांचे वर्चस्व हे फार महत्त्वाचे घटक आहेत. स्त्रीला भोगवस्तू समजणे हे याच व्यवस्थेतून पुढे झिरपते. बसल्या बसल्या महिलांना धक्के मारणारे पुरुष असतात. मी अशा ८० वर्षांच्या म्हाताऱ्या गृहस्थांची दृष्टी, त्यांचे मागे लागणे, महिला दिसल्या की स्पर्श करण्याचा प्रयत्न करणारे आणि वेळप्रसंगी मार खाणारे असे म्हातारे पाहिले आहेत, पण प्रत्येक ज्येष्ठ नागरिक असा असेलच असे नाही. अशा विकृत ज्येष्ठ नागरिकांना खडे बोल सुनावणारे ज्येष्ठ पुरुष नागरिकही आम्ही पाहिले आहेत.
रूपा कुळकर्णी म्हणाल्या, ज्येष्ठ नागरिकांच्या त्रासाच्या अशा कित्येक घटना कानावर येतात. अशी विकृती फार मोठय़ा प्रमाणावर असते. मात्र, अपवादादाखल ज्येष्ठ नागरिक सज्जनही असतात. हल्ली सज्जनता ही अपवादात्मक झाली आहे! पण सगळेच ज्येष्ठ नागरिक तसे नाहीत. हात लावणे, काहीतरी पाचकळ बोलणे याच्या तक्रारी असतातच. वयस्क माणसाने अश्लील वर्तन केल्याचे किस्से घडतात. कदाचित तुम्ही तसे नसाल म्हणजे झाले. आमच्या घरकामगार महिलांचेही आम्हाला आता सर्वेक्षण करावे लागेल. ‘साहेबांचीही नजर काही बरी नाही’, असे त्या बोलतातच.
डॉ. सुनीती देव म्हणाल्या, सार्वजनिक बसने दहा-पंधरा किलोमीटर प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन मुलींनासहप्रवाशांकडून काही त्रास होतो का, हे जाणून घेण्यासाठी त्यांना प्रश्नावली दिली. मुलींनी दिलेल्या उत्तरांमधून अविश्वसनीय, परंतु सत्य वास्तव परिस्थिती समोर आली. ती म्हणजे, या युवतींना तरुणवर्गाकडून त्रास होत नव्हता, उलट कोणी त्रास दिला, देत असेल तर त्यांच्याकडून सहाय्यच मिळाले, परंतु वयाने ज्येष्ठ व्यक्ती मात्र मुद्दाम धक्का मारणे, द्वयर्थी बोलणे, अश्लील हावभाव करणे, नको तेथे स्पर्श करणे, टक लावून पाहणे इत्यादी प्रकारांनी त्रास देतात, देण्याचा प्रयत्न करतात.
या विद्यार्थिनींनी आपापल्या वैचारिक कुवतीनुसार काही उपायही सुचविलेत. उदा. महिलांची स्वतंत्र बस, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे, महिला बसवाहक, तक्रार वही इत्यादी. हे सर्व उपाय समस्येचे तात्पुरते निवारण करण्याच्या दृष्टीने मलमपट्टी म्हणून ठीक आहेत. त्यांचा मर्यादित स्वरूपात फायदाही होऊ शकेल, परंतु त्यामुळे समस्येचे कायमस्वरूपी निराकरण होणार नाही. ते जर व्हायचे असेल तर पुरुषांची स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणून बघण्याची जी विकृत मानसिकता आहे ती बदलायला हवी, ही स्त्रियांची सनातन मागणी आहे. मनोवृत्ती बदलणे कठीण असले तरी अशक्य नाही.
कोणत्या वयापासून मुलगी किंवा स्त्री ही पुरुषांच्या वासनांध नजरेला, स्पर्शाला, अत्याचाराला बळी पडू शकते.. तर अवघ्या पाच-सहा महिन्यांच्या बालिकेपासून ते थेट वयाची आठ दशके ओलांडलेली वृद्ध स्त्री, एवढा ‘विशाल’ पट आहे. लहान बालिकेला आजोबांजवळ सुरक्षित राहील, या विचाराने ठेवले तर माऊलीला पश्चाताप करायची वेळ येते. आजोबाच त्या अजाण बालिकेशी चाळे करताना दिसतात. आजोबाच कशाला? खुद्द जन्मदात्या बापापासूनही मुलगी सुरक्षित आहे, असे म्हणता येत नाही. तीन-चार वर्षांच्या मुलींचे चॉकलेट, पेपरमिंट वगैरे खाऊचे आमिष दाखवून काका, मामा, शेजारच्या दादांकडून लैंगिक शोषण केले जाते. महाविद्यालयीन तरुणी थोडय़ा वयाने, अनुभवाने जाणत्या वयाच्या असल्याने त्यांना या ‘म्हाताऱ्या अर्काकडून’ होणाऱ्या त्रासापासून स्वत:ला वाचविता येऊ शकते, त्यांना त्यांची जागा दाखवून देता येते, परंतु धोके संभवतातच!
नऊ ते चौदा वयोगटाच्या मुलामुलींसाठी भरवली जाणारी वेगवेगळी उन्हाळी शिबिरे, छंदवर्ग हेही लैंगिक शोषणाचे केंद्र बनत चाललेली आहेत. पाल्य, विशेषत: मुलगी जर शिबिराला जाण्याचे नाकारत असेल तर तिच्यावर सक्ती करू नये.
शिबिराचे आबा, काकाच या बालिकांचे लैंगिक शोषण करीत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्त्रीचे कोणतेही वय हे धोक्याबाहेर आहे, असे म्हणता येत नाही, असेही डॉ. सुनीती देव म्हणाल्या.