अमरावती बाजार समितीतील शेतमालाचे नुकसान

तापमानाच्या ४५ अंश सेल्सिअस पाऱ्याचा अनुभव घेत असतानाच अचानक वादळी वारा आणि पावसाने अमरावती, चंद्रपूर व नागपूर शहरात तब्बल अर्धातास मुशाफिरी करत नागरिकांना सुखद धक्का दिला. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमालाचे नुकसान झाले.

दुपारी तीन वाजेपासूनच आकाशात ढगांची गर्दी झाली आणि वादळी वाऱ्यासह काही भागात चांगलाच तर काही भागात कमी प्रमाणात पाऊस बरसला. दरम्यान, रस्त्यावरील फेरी विक्रेत्यांची आणि या वादळी पावसात सापडलेल्यांची चांगलीच धावपळ उडाली. दुपारी साडेतीन ते चार वाजेदरम्यान या अध्र्या तासाच्या कालावधीत थंडाव्याची अनुभूती नागपूरकरांनी घेतली.

नवतपाचा काळ म्हणजे तापमानाचा उच्चांक गाठणारा, पण दरम्यानचे तीन-चार दिवस वादळीपावसासह येऊन पुन्हा तापमानाकडे वळणारा. नवतपाच्या पूर्वसंध्येलाच तापमानाच्या उच्चांकाची नोंद होत असताना शनिवारी दुपारी पावसाने सुखद धक्का दिला. ही स्थिती उद्याही कायम राहण्याचे संकेत असून २९ ते ३१ मे दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जवळपास सर्वच ठिकाणी ही स्थिती आहे.

नागपूरच्या २५ किलोमीटर उत्तरेला वादळ सुरू असून त्याचाच परिणाम म्हणून नागपूर शहरातही वारा, धूळ आणि पावसाने आगमन केले. रामटेक परिसरातही चांगलाच पाऊस पडला. या अध्र्यातासाच्या घडामोडीत नागपूरच्या तापमानात तब्बल १० अंश सेल्सिअसचा फरक पडला. दुपारी ३ वाजता ४५ अंश सेल्सिअस असलेले नागपूरचे तापमान दुपारी ४ वाजताच्या सुमारास मात्र ३५ अंश सेल्सिअस इतके दाखवण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून ढग आकाशात डोकावत असले तरीही उन्हाचा तडाखा मात्र कायम होता.

नवतपाच्या तिसऱ्या दिवशी चंद्रपुरात ४७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. आज शहरात दिवसभर कडक उन्ह तापले असतांनाच सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह चंद्रपूर व चिमूर भागात पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात बऱ्याच दिवसानंतर चंद्रपूरकरांनी गारवा अनुभवला.  चंद्रपूर सोबतच चिमूर, नेरी व परिसरात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे लोक सुखावले आहेत. अमरावती शहरातही सायंकाळच्या सुमारास वादळीवाऱ्यासह सुमारे अर्धातास पाऊस आला. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील अन्नधान्य साठाही ओला झाला.