राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र प्रचारक अध्यक्ष असलेल्या धरमपेठ शिक्षण संस्थेत प्रथमच लोकशाही पद्धतीने मतदान होऊन विद्यमान अध्यक्ष व कार्यवाह यांच्या विरोधात मतदारांनी रोष व्यक्त केला.
रा.स्व. संघाच्या सल्ल्याने आतापर्यंत संस्थेची निवडणूक व्हायची. संस्थेची स्थापना झाल्यापासून लोकशाही पद्धतीने निवडणूक होण्याची ही पहिलीच वेळ होती. संस्थेत दर तीन वर्षांनी निवडणूक होते. ती केव्हा होणार, याची वाच्यता फारशी होत नसे. कारण, आतापर्यंत संघाच्या सल्ल्याने अविरोध निवडणूक पार पाडण्याची परंपरा संस्थेने सांभाळली आहे. मात्र, सल्ला देण्यासाठी थेट क्षेत्र प्रचारकाचीच अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यात संस्था चालवताना इतरांचा सन्मान करण्याची, तसेच सर्वानी घेऊन चालण्याची प्रथा खंडित झाली. त्यातून अनेकजण अस्वस्थ झाले. संस्थेतील विद्यमान व्यवस्थेविरोधात जाहीरपणे असंतोष व्यक्त न करता मतदारांनी तो मतदानाच्या माध्यमातून व्यक्त केला. अध्यक्ष रवी जोशी आणि कार्यवाह यांच्या विरोधात मतदारांनी मतदान करून संस्थेत चाललेल्या मनमानीविरोधात नापसंती व्यक्त केली.
संस्थेची स्थापना झाल्यापासून मतदार, निवडणूक अधिकारी, मतदान आणि विजयी व पराभूत उमेदवार, अशी लोकशाही पद्धतीने निवडणूक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. संस्थेत दर तीन वर्षांनी निवडणूक होते. यापूर्वी संस्थेच्या विकासाची रूपरेषा ठरवताना संस्थेतील पाच-दहा ज्येष्ठ मंडळी एकत्र येऊन विचारविनिमय करून कोणाला कोणती जबाबदारी द्यायची, हे ठरवायचे. त्यामुळेच उमेदवार अविरोध निवडून यायचे. मतदान करून निवडणूक होत नव्हती. मात्र, संस्थेत गेल्या वर्षभरात सर्वाना घेऊन चालण्याऐवजी ‘हम करे सो कायदा’ ही जी हुकूमशाही पद्धत बळावली त्यामुळे अनेक ज्येष्ठ मंडळी दुखावली गेली. वेळोवेळी त्यांचा असंतोष उफाळून आला. काही मंडळींनी धर्मादाय सहआयुक्तांकडे गाऱ्हाणीही मांडली, काहींनी न्यायालयात याचिका दाखल केली, तर काहींनी प्रसारमाध्यमांच्या व्यासपीठावर संस्थेत होणाऱ्या मनमानीवर आसूड ओढण्याचा प्रयत्न केला. त्याचाच परिपाक संस्थेच्या निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आला.
आश्रयदाते, देणगीदार, उपकारकर्ते, सहानुभूतीदार आणि वर्गणीदार, अशा पाच प्रवर्गातून ही निवडणूक होत असते. त्यापैकी आश्रयदाते, उपकारकर्ते आणि सहानुभूतीदार या तीन गटात मतदान घेऊन मतदारांचा कौल लक्षात आला, तर देणगीदार आणि वर्गणीदार या दोन गटात अविरोध निवड करण्यात आली. देणगीदार, उपकारकर्ते आणि सहानुभूतीदार या तीन प्रवर्गातून प्रत्येकी तीन जण निवडणूक आले. यात अ‍ॅड. उल्हास औरंगाबादकर, नरेंद्र देशपांडे, रत्नाकर केकतपुरे, दीपक दुधाने, आनंद आपटे, मेधा नांदेडकर, किरण संगवई, डॉ. रामचंद्र तुपकरी आणि संजीव देशपांडे आदींचा समावेश आहे. निवडून न येणारे एक-दोन मतांनी पराभूत झाले. संस्थेच्या एकूण ६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदारांची संख्या जरी कमी असली तरी एकेक मतदार तीन-चार प्रवर्गात मतदान करणारा असल्याने मतदारांची संख्या जास्त होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

रविवारी, २४ एप्रिलला खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक पार पडली. त्याचे श्रेय मतदारांबरोबरच निवडणूक अधिकाऱ्यालाही जाते. संस्थेच्या कार्यकारिणीने निवडलेले निवडणूक अधिकारी मंगेश जोशी यांनी नि:ष्पक्षपणे निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली. जोशी हे संस्थेचे मतदार आणि सदस्यही आहेत. त्यांनी नि:ष्पक्षपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडल्याने अनेक मतदार सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले.