गैरव्यवहाराच्या आरोपावरून कारागृहात असणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या मालकीच्या येथील भुजबळ फार्मवरील मालमत्तेच्या मूल्यांकनास सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरुवात केली. सक्तवसुली संचालनालयाने भुजबळांच्या २२ मालमत्तांवर अलीकडेच टाच आणली होती. त्यामुळे तपासयंत्रणा येथे दाखल झाल्यामुळे भुजबळांचे हे अधिकृत निवासस्थानही जप्त होईल, अशी चर्चा कर्णोपकर्णी पसरली. तथापि, पथक जप्तीसाठी नव्हे, तर भुजबळांच्या ऐश्वर्यसंपन्नतेची मोजदाद करण्यासाठी आल्याचे स्पष्ट झाल्यावर ही उत्सुकता काहीशी ओसरली.
याआधी सक्तवसुली संचालनालय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या फार्मवर छापे टाकले आहेत. बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भुजबळ यांच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या तपासकामी सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास या विभागाचे पथक पाच ते सहा वाहनांमधून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गालगतच्या भुजबळ फार्मबाहेर दाखल झाले. त्यांच्यासमवेत बांधकाम विभागाचे अभियंते होते. भुजबळ कारागृहात गेल्यापासून कुटुंबीय मुंबईला निघून गेले आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षक व कार्यालयातील दोन-तीन कर्मचारी वगळता कोणी नव्हते. पथकाला पाहून इतर कर्मचारी बाहेर पडले तर भुजबळ यांच्या निकटवर्तीयाने येथे धाव घेतली. दरम्यानच्या काळात तपासपथकाने आपल्या कामास सुरुवात केली. या परिसरात तीन बंगले, भुजबळ यांचे कार्यालय आणि आलिशान राजमहाल आहे. तपासपथकाने बांधकामे, मोकळी जागा व तत्सम बाबींचे मोजमाप अभियंत्याच्या मदतीने सुरू केले. घरातील इतर सर्व साधन व सामग्रीची मोजदाद करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ही कार्यवाही सुरू असताना भुजबळ फार्म जप्तीची कारवाई सुरू असल्याची वंदता सर्वत्र पसरली. भुजबळ यांना आता घरही राहणार नसल्याची चर्चा सुरू झाली. परंतु दुपापर्यंत त्यात तथ्य नसल्याचे अधोरेखित झाले. यापूर्वी अशा घडामोडीत राष्ट्रवादीचे पदाधिकारी व प्रामुख्याने समता परिषदेशी संबंधित भुजबळ यांचे समर्थक फार्म बाहेर धाव घेऊन सूडबुद्धीने ही कारवाई केली जात असल्याचा आरोप करीत असे. या दिवशी एक-दोन जणांचा अपवाद वगळता कोणी फिरकले नाही. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली. संबंधितांनी तपास अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु, माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शविली.

३० हजार चौरस फुटांचा महाल
भुजबळ फार्म परिसरातील आलिशान महाल हा सर्वाच्या उत्सुकतेचा विषय आहे. सात ते आठ फूट उंचीची संरक्षक भिंत आणि त्यालगत उंच झाडांनी वेढलेल्या परिसरात ३० हजार चौरस फूट आकाराचा हा महाल फारसा कोणाच्या दृष्टीस पडत नाही. जवळपास दोन वर्षे या महालाचे काम चालले होते. २०१४ मध्ये भुजबळ या महालात वास्तव्यास गेले. जुन्या काळातील राजेशाही महालाची आवृत्ती असणाऱ्या या हवेलीत २५ खोल्या आहेत. राजस्थानी पद्धतीच्या दुमजली महालास जलतरण तलाव, टेनिस मैदान, विस्तीर्ण हिरवळ असा आधुनिकतेचाही स्पर्श झाला आहे. तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकडून महागडय़ा वस्तूंची यादी, त्यांची किंमतनिश्चिती या स्वरूपाचे काम सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Vartaknagar Police Colony
प्रकल्प खर्च वसुलीसाठी गृहबांधणीऐवजी भूखंडविक्री, वर्तकनगर पोलीस वसाहत पुनर्विकास; ४०० कोटी अपेक्षित
Kamathipura Redevelopment
कामाठीपुरा पुनर्विकासासाठी सल्लागाराची नियुक्ती
Transfer, social justice department
सामाजिक न्याय विभागात एकच अधिकारी दहा वर्षांपासून एकाच पदावर, पुन्हा नवीन कार्यभार…
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन