नाशिक- सिन्नर महामार्गावर सोमवारी दुपारी भरधाव निघालेल्या मालमोटारीखाली सापडून दोन ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. सिन्नर येथील आडवा फाटा चौकात हा अपघात झाला. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, नाशिक शहरात झालेल्या अन्य अपघातात मालमोटारीखाली सापडून एकाचा मृत्यू झाला.
नाशिकहून भरधाव निघालेली मालमोटार सिन्नरच्या आडवा फाटा परिसरातील कडवा वसाहती जवळ आली असताना हा अपघात घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने मालमोटार रस्त्यालगतच्या विद्युत खांबावर जाऊन आदळली. खांबाला धडक दिल्यानंतर ती थांबली नाही. पुढे जाऊन तिने महाविद्यालयात निघालेल्या दिपाली सोपान बोऱ्हाडे (१८) आणि सायकलस्वाराला धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. आसपासच्या नागरिकांनी धाव घेऊन जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात हलविले. परंतु, दिपाली व सायकलस्वार यांचा आधीच मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दुसरा अपघात नाशिकच्या टाकळी रस्त्यावरील बोहरी कब्रस्थानजवळ घडला. जुन्या नाशिक परिसरातील टाकळी रस्त्यावरील बोहरी कब्रस्थानजवळ हा अपघात घडला. चालक भरधाव मालमोटार घेऊन निघाला होता. अचानक त्याचे नियंत्रण सुटले आणि मालमोटार कब्रस्तान आणि काका गोदामाची भिंत पाडून आतमध्ये शिरली. यावेळी गोदामातील मजूर आयुब सांडू शेख (३५) हा मालमोटारीखाली सापडला. त्याचा जागीच मृत्यू झाला. आसपासच्या नागरिकांनी धाव घेऊन चालकाला ताब्यात घेतले. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली.