दोन युवक रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मित्राला भेटण्यासाठी मोटार सायकलने भरधाव निघाले होते. नाशिकरोड परिसरात गस्तीवर असणाऱ्या बिट मार्शलला संशय आला. त्यांनी संबंधितांना थांबण्याचा इशारा केला. परंतु, पोलिसांना पाहून त्यांची गाळण उडाली आणि त्यांनी आपल्या दुचाकीचा वेग आणखी वाढविला. यामुळे बिट मार्शलचाही संशय बळावला आणि त्यांनी त्या दुचाकीचा पाठलाग सुरू केला. जवळपास १५ ते २० मिनिटे पाठलाग करूनही युवक थांबत नसल्याने बिट मार्शलने अखेरीस बंदुकीतून हवेत दोन फैरी झाडत त्यांना कसेबसे रोखले. संबंधितांना ताब्यात घेतल्यानंतर या पद्धतीने जीव काढून पळण्यामागे वाहन परवाना नसल्याने कारवाई होईल हे कारण पुढे आले.

नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. या घटनेमुळे वाहन अनुज्ञप्ती नाही म्हणून पळणाऱ्या युवकांना थेट हवेत गोळीबाराची अनुभूती घ्यावी लागली. नदीम अल्ताफ सय्यद (१९) आणि राज अन्वर मणियार (२१) अशी त्यांची नावे आहेत. अपघातात जखमी झालेल्या मित्राला रुग्णालयात भेटण्यासाठी काही युवक देवळाली कॅम्प भागातून दुचाकीने निघाले होते. यावेळी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे बिट मार्शल गस्तीवर होते. त्यांना युवकांच्या संशयास्पद हालचाली दृष्टिपथास पडल्या. छाननी करण्याच्या उद्देशाने त्यांनी थांबण्याचा इशारा दिला. पण, पोलिसांना पाहून युवक हबकले आणि दुप्पट वेगाने पळू लागले. बिट मार्शलने त्यांचा पाठलाग सुरू केला. रात्रीच्या वेळी फारशी वर्दळ नसल्याने हे युवक मार्ग बदलून पिच्छा सोडवून घेण्याच्या प्रयत्नात होते. परंतु, त्यांचे असे पळणे संशय वाढविणारे ठरले. काहीतरी गुन्हा करून ते पळत असल्याचा पोलिसांनी अंदाज बांधला. त्यामुळे बऱ्याच अंतरापर्यंत पाठलाग करून संबंधितांना रोखण्यासाठी प्रयत्न केले. वारंवार बजावूनही संशयित थांबत नसल्याने अखेर पोलिसांनी हवेत गोळी झाडण्याचा इशारा दिला. तरी देखील या युवकांनी जुमानले नाही. राज राजेश्वरी मंगल कार्यालयाच्या परिसरात बिट मार्शलने अखेर आपल्या पिस्तुलीतून हवेत दोन फैरी झाडल्या. तेव्हा कुठे संशयितांनी आपली दुचाकी थांबविली. या घटनेत कोणाला दुखापत झाली नाही. संबंधितांना ताब्यात घेऊन नाशिकरोड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या ठिकाणी त्यांची चौकशी करण्यात आली. वाहन परवाना नसल्याने पोलीस कारवाई करतील, या भीतीने दुचाकी थांबविली नसल्याचे संबंधितांनी सांगितले. यातील एक महाविद्यालयीन युवक असून दुसरा मजुरी करतो. या प्रकरणी दोघांवर धोकादायक पद्धतीने वाहन भरधाव चालविणे, पोलिसांचा हुकूम न पाळणे, वाहन अनुज्ञप्ती न बाळगणे आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.