म्हशीच्या गोठय़ाचा परवाना मंजूर करण्यासाठी ६५७० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या येथील जिल्हा दुग्ध व्यवसाय कार्यालयातील दुग्धशाळा पर्यवेक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.
तक्रारदाराचा वडिलोपार्जित दुग्ध व्यवसाय आहे. त्यांच्या वडिलांच्या नावे म्हशींच्या गोठय़ाचा परवाना होता. २०१४ मध्ये त्यांनी गोठा इतरत्र स्थलांतरित केल्याने पंचवटीतील पेठ रोडवरील गोठा बंदच होता. त्यामुळे त्यांचा परवानाही रद्द करण्यात आला होता. नवीन गोठय़ासाठी परवाना मिळण्यासाठी १० मे रोजी त्यांनी जिल्हा दुग्ध व्यवसाय कार्यालयाकडे अर्ज केला होता. नवीन परवाना मंजुरीसाठी तक्रारदाराने दुग्धशाळा पर्यवेक्षक वासुदेव लोटन बडगुजर याची भेट घेतली असता बडगुजरने सहा हजार रुपयांची मागणी केली. तसेच परवान्यासाठी लागणारे शासकीय शुल्क ५७० रुपये याप्रमाणे एकूण ६५७० रुपये द्यावे लागतील असे सांगितले. तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधल्यावर सापळा रचण्यात आला. त्यानुसार २२ मे रोजी दुपारी साडेबारा वाजता पंचवटीतील गोठय़ात बडगुजर यास ६५७० रुपये स्वीकारताना अटक करण्यात आली.