विद्यार्थी, पालकांची पुनर्पडताळणीनंतर तक्रार

औषधनिर्माणशास्त्र पदविका परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीत दरवर्षी मोठय़ा प्रमाणावर त्रुटी दिसून येत असून, यंदाही महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण परीक्षा मंडळातर्फे (एमएसबीटीई) २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत सदोष तपासणीचा मोठय़ा प्रमाणात फटका बसला असल्याची तक्रार विद्यार्थी व पालकांनी केली आहे. उत्तरपत्रिकांची पुनर्पडताळणी केल्यास गुणवाढ होण्याचे प्रमाण ३० ते ६० टक्क्य़ांपर्यंत जात असल्याने निष्काळजीपणे तपासणी करणाऱ्यांविरूध्द कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांतर्फे करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील विविध उच्च शैक्षणिक अभ्यासक्रमांना उत्तरपत्रिका पुनर्पडताळणीच्या हेतूने मागविल्या जाणाऱ्या छायाप्रतींच्या संख्येवर बंधन नसताना तंत्र शिक्षण मंडळाने औषधनिर्माणशास्त्र पदविका (डी.फार्मसी) परीक्षांबाबत हे बंधन जास्तीत जास्त दोन विषयांपर्यंत ठेवले आहे. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या सदोष मूल्यमापनाच्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यापासून वंचित ठेवण्याचाच हा एक भाग असून, त्यामुळे गुणवाढीची शक्यता असूनही विद्यार्थ्यांना न्याय मागता आलेला नसल्याचे पिंपळगाव बसवंत येथील राजेश बुब यांनी म्हटले आहे. वास्तविक माहिती अधिकार कायदा तसेच सर्वोच्च न्यायालयीन संदर्भातील विविध निकाल व पारदर्शक कामकाज प्रक्रियेचा भाग म्हणून सर्व विषयांच्या छायाप्रती मागविण्याची विद्यार्थ्यांस परवानगी असली पाहिजे. औषधनिर्माणशास्त्राच्या पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षांसाठी सहा लेखी व पाच प्रात्यक्षिक असे एकूण ११ विषय आहेत. त्यांना प्रत्येकी १०० पैकी गुण असून, उत्तीर्ण होण्यासाठी ४० गुण आवश्यक आहेत. तंत्र शिक्षण मंडळाच्याच परीक्षा नियमावली २०११ नुसार ११ विषयांपैकी तीन विषय अनुत्तीर्ण असल्यास एटीकेटी मिळाली पाहिजे. प्रत्यक्षात दोनच विषयांना सध्या एटीकेटी दिली जात असल्याने हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जात आहे. त्यामुळे लेखी व प्रात्यक्षिक मिळून तीन विषयांमध्ये अनुतीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांलाही एटीकेटी मिळावी, अशी मागणी बूब यांनी केली आहे.

चांदवड येथील डी. फार्मसी महाविद्यालयातील प्रथम वर्षांत एकूण २७ मुले पुढील वर्गात जाण्यास मूळ निकालात अपात्र ठरली होती. त्यापैकी पुनर्पडताळणीत अजून १० मुले पात्र झाली. विषयापैकी दोन विषयांचे बंधन पाळून ६८ विषयांबाबत विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकन केले असता ४९ विषयांत गुणवाढ झाल्याचे दिसते. सदरची तपासणी फक्त अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी केली होती. अन्य विद्यार्थ्यांची गुणदानाबाबत तक्रार असूनही ते अर्ज करू शकलेले नाहीत. छायाप्रती व पुनर्तपासणीचे निकाल पाहता मूळ तपासणीत अक्षम्य दोष असल्याचे दिसते. सध्या उत्तरपत्रिकेची छायाप्रत मागविण्यासाठी प्रत्येक विषयाकरिता ५०० रुपये याप्रमाणे शुल्क आकारले जाते. विद्यार्थ्यांची गुणवाढ झाल्यास फक्त पुनर्मूल्यांकनाचे शुल्क अर्जानंतर परत करण्यात येते. छायाप्रतीसाठी ५०० रुपये घेतले जातात. ही रक्कम अधिक असल्याने नाममात्र छायाप्रतीसाठी १०० ते २०० रुपये प्रतिविषयाप्रमाणे शुल्क आकारणी व्हावी. ती रक्कम अर्जात नमूद केल्याप्रमाणे गुणवाढ झाल्यास सरळ विनाअर्ज विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करावी, असेही बूब यांनी सुचविले आहे.