नाशिक जिल्ह्यातील घोटी येथे बनावट पदवी बाळगून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या महिलेला  पोलिसांनी अटक केली आहे. जयंत बराई असे या महिलेचे नाव आहे.  तालुका आरोग्य अधिकारी संजय पवार यांच्या फिर्यादीवरून बराई यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तात्काळ अटकेची कारवाई केली. घोटी पोलीस ठाणे परिसरात जुना आग्रारोड महामार्गावर सरोज चिकित्सालय नावाचा बोर्ड लावून जयंत बराई या महिला बोगस पदवी बाळगून वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. ग्रामीण जनतेची फसवणूक करणाऱ्या आणि त्यांच्या आरोग्याशी खेळून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या या महिलेच्या रुग्णालयाची घोटी पोलिसांनी पंचाच्या साक्षीने तपासणी करुन ही कारवाई केली. यावेळी वैद्यकीय व्यवसाय संबंधीचे पुस्तके, लेटर पॅड, व्हिजिटिंग कार्ड, उपचार करण्यात आलेल्या रुग्णांचे पत्ते, बाकी असलेले पैसे संबंधीची नोंदवही आणि शारीरिक चाचणी संबंधीचे संदर्भसेवेच्या पुस्तिका आढळून आल्या.

या चिकित्सालयात त्वचारोग, मुळव्याध, संधिवात, भगंदर यावर खात्रीशीर उपचार करण्यात येतील, असे रुग्णालयासमोरील बोर्डवर लिहिण्यात आलेले होते. जयंत बराई यांनी दाखवलेल्या पदव्या तपासण्यात आल्या.  त्यांनी दाखवलेल्या पदव्या महाराष्ट्र राज्यात वैद्यकीय व्यवसाय करण्यास पात्र नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बनावट पदवीकाधारक आणि नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

घोटीतील आदिवासी भागात बनावट तथा बोगस पदवी धारण केलेल्या अनेकांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने त्यांच्यावर कारवाई कधी होणार याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केला जात होता. गेल्या काही वर्षांत अनेक बोगस पदवी धारकांवर कारवाई करण्यात आली. मात्र पुढे काही दिवसांतच याठिकाणी पुन्हा नव्याने रुग्णालये सुरु झाल्याचे पाहायला मिळाले. या कारवाईनंतर उर्वरित बोगस पदवीधारक वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर लगाम कधी बसणार याकडे आता नागरिकांचे लक्ष लागून आहे.