शहरातील प्रमुख मार्गावरील वाहतुकीला अडथळा ठरलेली झाडे अपघातांना निमंत्रण देत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. शहरातून जाणाऱ्या नाशिक-पुणे रस्त्यावरील वडाच्या झाडावर भरधाव मोटार जाऊन आदळली. या अपघातात पाच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. मृतांमध्ये दोन युवती व तीन युवकांचा समावेश आहे. मृत व जखमी हे उपनगर व परिसरातील रहिवासी आहेत.

ऐन दिवाळीत घडलेल्या अपघाताने रस्त्यांवरील धोकादायक झाडांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. बिटको चौक ते द्वारका मार्गावर अशी अनेक झाडे आहेत. त्यांनी आजवर अनेक वाहनधारकांचा बळी घेतला आहे. वृक्षप्रेमींच्या विरोधामुळे ती झाडे हटविली जात नसल्याने अपघातांची मालिका कायम राहिल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

नाशिकरोड भागातील अंधशाळा बस थांब्यालगत रात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला. उपनगर व लोखंडेमळा परिसरात वास्तव्यास असणारे मित्र-मैत्रीण मोटारीने निघाले होते. चालकास रस्त्यातील झाडाचा अंदाज आला नाही आणि मोटार वडाच्या झाडावर जाऊन आदळली. त्यात प्रीती भालेराव-सुतार, पूजा भोसले-मते, सुरज बिरजे, निशांत बागूल यांचा जागीच मृत्यू झाला तर रितेश विश्वकर्मा आणि आनंद मोजाड हे जखमी झाले. मृतांमध्ये रिपाइं युवती आघाडीच्या अध्यक्षा प्रीती भालेराव यांचा समावेश आहे.

रुग्णालयात उपचार घेत असताना रितेश विश्वकर्मा याचाही मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजल्यानंतर रात्रीच रिपाइंचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रस्त्यावरील धोकादायक झाडांमुळे आजवर शहरातील वेगवेगळ्या भागात अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. स्थानिकांच्या रेटय़ामुळे गंगापूर रोडवरील बहुतांश धोकादायक झाडे काढण्यात आली.

परंतु, द्वारका ते नाशिकरोड, दिंडोरी रोडसह अनेक भागात प्रमुख मार्गावर डेरेदार वृक्ष आजही कायम आहेत. वृक्षप्रेमींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने वृक्षतोडीवर निर्बंध घातल्याचे कारण देऊन वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींचा विरोध आहे. वाढत्या अपघातांमुळे ही झाडे तोडण्याची मागणी स्थानिकांसह वाहनधारकांकडून सातत्याने होत आहे. यावर तोडगा निघत नसल्याने अपघाताचे सत्र सुरू आहे.