दुकाने सातत्याने बंद ठेवत लाभार्थीना धान्य वितरणात कसूर करणाऱ्या शहरातील वेगवेगळ्या भागातील पाच तर ग्रामीण भागातील काही रेशन दुकाने सील करण्याची कारवाई झाल्यामुळे रेशन दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

नांदगाव तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांनी ही कारवाई केली. शासनाकडून आलेल्या धान्यापासून गोरगरिब व गरजूंना वंचित ठेवणाऱ्या रेशन दुकानदारांविरुद्ध तहसीलदार देवगुणे यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. मनमाडसह तालुक्यातील गरजू आणि लाभार्थ्यांसाठी शासनाकडून दर महिन्याला मोठय़ा प्रमाणात धान्य पाठविले जाते. मात्र काही रेशन दुकानदार मनमानी कारभार करुन दुकाने सातत्याने बंद ठेवतात. गरजुंना वेळेवर धान्य दिले जात नाही. हातावर काम करणारे मजूर सणासुदीच्या काळात बाजारात धान्य खरेदी करुन सण साजरा करतात. लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित ठेवले जाते, अशा गंभीर तक्रारी आल्यानंतर देवगुणे यांनी रेशन दुकानांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्याची सुरुवात मनमाड शहरातून केली असता पाच दुकाने दोषी आढळून आली. त्यानंतर ग्रामीण भागातील वेगवेगळ्या गावांना भेट देण्यात आली. तेथेही हीच परिस्थिती आढळून आल्यानंतर गरजुंना धान्यापासून वंचित ठेवणाऱ्यांना दुकानांना सील ठोकण्यात आले. या कारवाईमुळे सर्वसामान्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.