कर्णबधिर विद्यार्थ्यांना माफक दरात सेल मिळणार

रचना विद्यालय माजी विद्यार्थी संस्थेच्यावतीने स्थापलेल्या राज्यातील पहिल्या श्रवणयंत्र सेल बँकेचे उद्घाटन डॉ. अनुप शहा, महाराष्ट्र समाज सेवा संघाचे अध्यक्ष चंद्रकांत धामणे, उपाध्यक्ष विजय डोंगरे व सचिव सुधाकर साळी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या बँकेमार्फत श्रवण यंत्रासाठी लागणारे सेल माफक दरात उपलब्ध करण्यात येणार आहेत. सद्य:स्थितीत बाजारात सहा सेलचे पाकीट बाजारात १८० रुपयांना उपलब्ध मिळते. या बँकेमार्फत विद्यार्थ्यांना तेच पाकीट १०५ रुपयांत दिले जाईल. गंगापूर रस्त्यावरील श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालयात ही सेल बँक कार्यान्वित करण्यात आली. या कार्यक्रमास माजी विद्यार्थी संस्थेचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभ मेहता, उपाध्यक्ष राहुल भावे, साहेबराव हेम्बाडे, सीमा भदाणे उपस्थित होते. या शाळेत एकूण १५० कर्णबधिर विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यातील शून्य ते पाच वयोगटातील २६ विद्यार्थी शिशू निदान केंद्रात आहेत. शहरातील कर्णबधिर विद्यार्थी, माजी विद्यार्थी व श्रवणयंत्र वापरणाऱ्या ज्येष्ठांनाही टप्प्याटप्प्याने या बँकेचा लाभ देण्याचे नियोजन आहे. डॉ. अनुप शहा यांनी या अनोख्या बँक उपक्रमाविषयी समाधान व्यक्त करत या प्रकल्पासाठी भरीव योगदान देण्याची तयारी दर्शविली.

प्रारंभी, या उपक्रमाची संकल्पना मांडणाऱ्या प्रकल्प समन्वयक अर्चना कोठावदे यांनी सेल बँकेची गरज अधोरेखित केली. कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या ज्ञान ग्रहणात श्रवण यंत्रणा महत्त्वाची असते. या यंत्राद्वारे त्यांना काही अंशी ऐकू येते. सभोवतालचे शब्द एकसारखे कानावर पडले की, त्यांना संवाद साधण्यात मदत होते. यामुळे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांनी खरेतर हे यंत्र वापरणे गरजेचे आहे. परंतु सेलचा खर्च अधिक असल्याने यंत्राचा वापर टाळला जातो. अनेकदा सेल नसल्याने ती बंद असतात.

श्रवण यंत्रणा कायमस्वरूपी कार्यान्वित ठेवण्यासाठी काही दिवसात सेल बदलावे लागतात. खर्चामुळे काटकसरीचे धोरण ठेवून यंत्रणा वापरली जाते, याकडे कोठावदे यांनी लक्ष वेधले. कर्णबधिर विद्यार्थ्यांना भेडसावणारी अडचण लक्षात घेऊन बँकेमार्फत माफक दरात सेल उपलब्ध करण्यासाठी रचना विद्यालय माजी विद्यार्थी संस्थेने हा पुढाकार घेतल्याचे हेम्बाडे यांनी नमूद केले.