द्राक्ष, सोयाबीन, भाजीपाल्याचे मोठे नुकसान

जिल्ह्य़ात सलग पाचव्या दिवशी पावसाचे थैमान कायम राहिल्याने द्राक्ष, सोयाबीन, भात, नागली, भुईमुगासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. मुसळधार पावसात इगतपुरी तालुक्यात भात पिके आडवी झाली. बुधवारी दिवसभर पाऊस सुरू राहिल्याने गोदावरीच्या पातळीत वाढ झाली. पावसाने पिकांचे कोटय़वधींचे नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर चाललेल्या पावसाने खरेदीचा उत्साहही मावळला आहे.

शनिवारपासून जिल्ह्य़ात पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. मागील चोवीस तासांत ४२७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गंगापूर धरणातून ५११६ तर दारणा धरणातून १७०० क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. बहुतांश धरणे यापूर्वीच तुडुंब झाली असल्याने पाऊस आल्यावर विसर्ग करणे भाग पडते. मुसळधार पावसाची झळ हातातोंडाशी आलेल्या पिकांना बसली. दिंडोरी तालुक्यात ४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पश्चिम पट्टय़ात द्राक्ष व सोयाबीनसह भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आली.

पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे सर्व पिके पाण्याखाली गेली आहेत. बहुतांशी पिके पिवळी पडू लागली. ऊन पडताच ती कोमेजून जातील, अशी भीती शेतकरी व्यक्त करतात. मोहाडी-जानोरी येथील पॉलीहाऊसधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सततच्या पावसाने पॉलीहाऊसमधील पिकेही सडू लागली. जमिनीची धूप होऊन काळी माती वाहून गेली. त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास नुकसानीत वाढ होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. दिंडोरीप्रमाणे इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व इतर तालुक्यांतील पिकांची वेगळी स्थिती नाही. छाटणी झालेल्या व सुरू असलेल्या द्राक्ष बागांसमोर पावसाने संकट उभे केले आहे.

मागील चोवीस तासांत नाशिक पाच, इगतपुरी ३९, त्र्यंबकेश्वर १२, दिंडोरी ४०, पेठ ३९, निफाड ९, सिन्नर २३, चांदवड ३५, देवळा ६७, येवला ३९, मालेगाव ३०, बागलाण १६, कळवण ६५, सुरगाणा ७ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने सलग दोन दिवसांपासून गंगापूर व दारणा धरणातून पाणी सोडण्यात आले. मंगळवारी रात्री गंगापूरमधील विसर्ग वाढविण्यात आला. शहर परिसरात पडणारा पाऊस आणि धरणातून सोडलेले पाणी यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली. परतीच्या पावसाने उशिरापर्यंत मुक्काम ठोकल्याने या वर्षी पूर पाहण्याची संधी अखेपर्यंत मिळाली. बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहू लागले. सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले. दिवाळीला केवळ तीन ते चार दिवसांचा कालावधी बाकी आहे. या काळात बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने ओसंडून वाहतात. पावसामुळे बाजारपेठा ओस पडल्याने व्यावसायिकही धास्तावले आहेत.

दिंडोरीत नदी-नाल्यांना पूर

दिंडोरी तालुक्यात नदी-नाल्यांना पूर आला आहे. बाणगंगा नदीला पूर आल्याने जानोरी-मोहाडी रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. नाशिक-कळवण रस्त्यावर रनतळ परिसरात ओहोळाचे पाणी आल्याने सुमारे दोन तास वाहतूक बंद झाली. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या, तर काही वाहनधारकांनी मडकीजांब, इंदोरेमार्गे प्रवास केला. पालखेड येथील ओहोळाला पूर आल्याने खडक सुकेणेचा संपर्क तुटला. कादवा नदी दुथडी भरून वाहत आहे.