शहर परिसरात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने नागरिकांच्या जिवाची काहिली होत असताना आरोग्य विभाग मात्र उपाययोजना करण्याबाबत सुस्त असल्याचे चित्र आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात ‘उष्माघात कक्ष’ स्थापन करण्याविषयी केवळ बैठका सुरू आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सर्व आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन करत मुबलक औषधसाठा उपलब्ध करून दिला आहे.
गेल्या महिनाभरापासून टळटळीत उन्हाने सर्वसामान्यांच्या अंगाची काहिली झाली आहे. एप्रिलच्या सुरुवातीपासून उंचावणाऱ्या तापमानाने पुढील काळात ४० अंशांचा टप्पा ओलांडला. मे महिन्यात सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उन्हाचे चटके बसत आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये तापमानाने गाठलेली ही पातळी आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण करण्यास कारक ठरत आहे. वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे गर्भवती माता, रुग्णांना भोवळ येणे यासह थकवा, अशक्तपणा जाणवण्याचा त्रास होत आहे.
डायरिया व ‘सन स्ट्रोक’, ‘सन बर्न’च्या रुग्णांची संख्या वाढत असताना आरोग्य विभाग सतर्क होईल, अशी अपेक्षा होती. मात्र जिल्हा रुग्णालयात या संदर्भात बैठकीची निव्वळ औपचारिकता पार पडली. प्रत्यक्ष उपाययोजना काहीच झाल्या नाही, अशी स्थिती आहे.
जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात या संदर्भात सोय करण्यात आली असून अद्याप उष्माघाताचा एकही रुग्ण दाखल झालेला नाही. उष्माघातासाठी स्वतंत्र कक्ष असावा, अशी स्थिती नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले. रुग्णालयात पुरेसा औषधसाठा असून रुग्ण आल्यास त्याच्या शारीरिक क्षमतेनुसार त्या त्या विभागात दाखल केले जाईल असे त्यांनी नमूद केले. ग्रामीण भागात उन्हाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय यांसह अन्य उपकेंद्रात उष्माघाताचे स्वतंत्र कक्ष तयार केले आहेत. त्या ठिकाणी रुग्ण दाखल झाल्यानंतर त्यास सलाइन, ओआरएच आणि इलेक्ट्रो पावडर यांसह अन्य साधनसामग्री उपलब्ध करून दिली जाते. आतापर्यंत उन्हामुळे चक्कर येणे वा तत्सम रुग्ण दाखल झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांनी दिली.

उष्माघात व उष्माघात रुग्णांवर करायची उपाययोजना
सर्वसाधारणपणे दरवर्षी एप्रिल, मे, जून या महिन्यांत उष्माघाताचा प्रादुर्भाव असतो. तसेच त्यामुळे मृत्यू होणेही संभवनीय आहे. उष्माघाताने मृत्यू होऊ नये यासाठी नागरिकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. रुग्णांना तातडीने औषधोपचार मिळण्याची तयारी आधीच करून ठेवणे गरजेचे आहे.
लक्षणे
* थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे
* भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, पोटऱ्यात वेदना येणे अथवा पेंडके येणे
* रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी व अस्वस्थता, बेशुद्धावस्था उष्माघात होण्याची कारणे
* उन्हाळ्यात शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे.
* कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे.
* जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे.
* घट्ट कपडय़ांचा वापर करणे

प्रतिबंधात्मक उपाय
* वाढत्या तापमानात फारवेळ कष्टाची कामे करणे टाळावे.
* कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमानात करावी.
* उष्णता शोषून घेणारे कपडे वापरू नयेत. सैल, पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत.
* जलसंजीवनीचा वापर करावा, भरपूर पाणी प्यावे
* उन्हात काम करणे टाळावे व सावलीत अधूनमधून विश्रांती घ्यावी.
* उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरणे यांचा
वापर करावा.