पहिल्या दिवशी हुलकावणी देणारा हवामान विभागाचा पावसाचा अंदाज नंतर मात्र खरा ठरला. रविवारपासून सुरू असलेली संततधार दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारीही कायम राहिली. मागील चोवीस तासांत जिल्ह्य़ात ७७८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाचा अधिक जोर आहे. काही काळ पावसाने विश्रांती घेतल्याने शहरात साचलेल्या पाण्याचा निचरा झाला.

नाशिकमध्ये प्रारंभीच्या दोन महिन्यांत पावसाने निम्म्याहून अधिक भागांत दमदार हजेरी लावली होती. नंतर तीन आठवडे तो अंतर्धान पावला. अधूनमधून रिमझिम सरींनी काही भागांत त्याने अस्तित्व अधोरेखित केले. हवामान विभागाने मुसळधार पर्जन्यवृष्टीचा अंदाज दिल्याने ज्या तालुक्यात अद्याप त्याने दमदार हजेरी लावली नव्हती, तिथे दिलासा मिळेल अशी आशा निर्माण झाली; परंतु जिल्ह्य़ात मुसळधार पाऊस होत असूनही ते भाग अद्याप दमदार पावसापासून वंचित राहिल्याचे दिसून येते.

सोमवारी सकाळपर्यंत सर्वाधिक  म्हणजे ११९ मिलिमीटर पाऊस त्र्यंबकमध्ये पडला. श्रावणी सोमवारनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांची त्यामुळे तारांबळ उडाली. शहरात सर्व भागांत पाण्याचे साम्राज्य होते. सोमवारी काही काळ विश्रांती घेतल्याने पाण्याचा निचरा होण्यास हातभार लागला. रस्त्यावरील चिखल त्रासदायक ठरला. या भागातील पावसाचे पाणी गंगापूर धरणात येते. आदल्या दिवशीपासून सुरू असलेला गंगापूर धरणातील विसर्ग सोमवारी कायम होता. गंगापूर धरणातून ५९८२ क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले. होळकर पुलाखाली दुपारी सुमारे आठ हजार क्यूसेक्स पाणी वाहत होते. गेल्या महिन्यात दोन ते तीन वेळा गोदावरीला पूरस्थिती निर्माण झाली होती. संततधार कायम असल्याने पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन काठावरील नागरिकांना सतर्क करण्यात आले.

इगतपुरीतील दारणा धरणातून ३३८३ क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले. या भागात चोवीस तासांत ९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नांदगाव तालुक्यात ९६, सुरगाणा ९३, पेठ ६७, सिन्नर ५२, येवला ५७, दिंडोरी ३७, नाशिक ३१, देवळा २७, कळवण व मालेगाव प्रत्येकी २२, चांदवड १७.६, निफाड १३.२ पावसाची नोंद झाली. काही तालुक्यांत आतापर्यंत झालेल्या पावसाने एक हजाराचा टप्पा ओलांडला असला तरी मालेगाव, चांदवड, देवळा, बागलाण, निफाड व सिन्नर तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे. या तालुक्यात आतापर्यंत किमान २४४ ते ४३७ मिलिमीटपर्यंत पाऊस पडला.

दुतोंडय़ा मारुतीचा निम्मा भाग पाण्याखाली

गंगापूर व दारणा धरणांतून पाणी सोडल्यामुळे गोदावरी व दारणा नदी दुथडी भरून वाहत आहे. गोदापात्रातील दुतोंडय़ा मारुतीचा निम्मा भाग पाण्याखाली बुडाला. महिनाभरानंतर पुराची अनुभूती मिळत असल्याने बघ्याची गर्दी वाढली आहे. पूर पाहावयास येणाऱ्यांना धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्यास प्रतिबंध करण्यात आला. कोणतीही दुर्घटना घडू नये, अशी दक्षता घेतली जात असली तरी महाविद्यालयीन विद्यार्थी सोमेश्वर धबधबा व तत्सम ठिकाणी धोक्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले.

सरासरी ९० टक्क्यांवर

नाशिक : संततधार पावसामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरीच्या सहा टक्के अधिक पाऊस झाला आहे. ऑगस्टच्या उत्तरार्धात जिल्ह्य़ात १३ हजार ७९९ मिलिमीटर अर्थात सरासरीच्या ९०.७८ टक्के पावसाची नोंद झाली. मागील वर्षीचा विचार केल्यास हे प्रमाण ८९४ मिलिमीटरने अधिक आहे. यामुळे काही अपवाद वगळता बहुतांश धरणे भरली आहेत.

पावसाला अद्याप दीड महिना बाकी असल्याने यंदा वार्षिक सरासरी पर्जन्यमान ओलांडले जाईल, असे चित्र आहे. जिल्ह्य़ाचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान १५ हजार २०० मिलिमीटर आहे. आतापर्यंत १३ हजार ७९९ इतका पाऊस पडला. त्यात सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरीत आहे.

या तालुक्यात ३२०८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल पेठचा क्रमांक आहे. या तालुक्यात २०६३ मिलिमीटर पाऊस झाला. त्र्यंबकेश्वर तालुक्यात १९७८, सुरगाणा १७७७, नाशिक ९०६, दिंडोरी ६६३, कळवण ५१०, नांदगाव ४६७ असा पाऊस झाला. उर्वरित मालेगाव २४४, चांदवड ३५२, बागलाण २७१, देवळा २७४, निफाड ३२८, येवला ३१२ मिलिमीटर या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. पावसाचे प्रमाण वाढले असले तरी काही भाग आजही त्यापासून दूर राहिल्याचे लक्षात येते. उपरोक्त तालुक्यात अधूनमधून रिपरिप सुरू असली तरी त्याचे प्रमाण कमी आहे. यामुळे पावसाची सरासरी गाठली गेली तरी काही भागांत तो अधिक, तर काही भागांत तो कमी राहील की काय, अशी साशंकता व्यक्त होत आहे.

पावसाने बहुतांश धरणे भरण्याच्या मार्गावर असून एकूण जलसाठा ७८ टक्क्यांवर पोहोचला आहे. नागासाक्या, माणिकपुंज व नांदूरमध्यमेश्वर बंधारा अद्याप रिक्त आहे. जिल्ह्य़ातील लहानमोठय़ा धरणांची एकूण ६५ हजार ८१४ इतकी क्षमता आहे. सध्या त्यात ५१ हजार ५९९ म्हणजे ७८ टक्के जलसाठा झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

धरणे भरण्याच्या मार्गावर

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ५१४० (९१ टक्के), काश्यपी १८२८ (९९), गौतमी गोदावरी ९७० (१००), पालखेड ५३७ (८२), करंजवण ५१३० (९६), वाघाड २३०२ (१००), ओझरखेड २१३० (१००), दारणा ६८०९ (९५), भावली १४३४ (१००), वालदेवी ११३३ (१००), कडवा १५१९ (९०), भोजापूर ३६१ (१००), हरणबारी ११६६ व केळझर ५७२ (दोन्ही १००) जलसाठा झाला आहे. पुणेगावमध्ये ५२६ (८४), तिसगाव ४०१ (८९), चणकापूर १८७० (७७), गिरणा ९७०७ (५२), पुनद धरणात ११११ (८५) असा जलसाठा झाला आहे.