गोदावरी आरतीसाठी २० लाखांचा निधी

राज्यातील पर्यटन विकासासाठी स्वतंत्र संचालनालय स्थापन करण्यात येणार आहे. पर्यटन स्थळांचा विकास करून नाशिक जिल्हा जगाच्या पर्यटन नकाशावर आणण्याचाही प्रयत्न केला जाणार असल्याचे राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. गोदावरी आरतीसाठी २० लाखांचा निधी देण्याचे त्यांनी जाहीर केले.

शनिवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पर्यटन आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी खा. हरिश्चंद्र चव्हाण व हेमंत गोडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, आ. प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी २०१७ हे वर्ष ‘व्हिजिट महाराष्ट्र वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. या पाश्र्वभूमीवर नाशिकच्या पर्यटन स्थळांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्याची सूचना त्यांनी केली. लोणावळ्याला पर्याय म्हणून इगतपुरी परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने नियोजनबद्ध विकास केला जाईल. विविध विभागांनी समन्वयाने पर्यटन विकासासाठी प्रयत्न करायला हवेत. उद्योगात गुंतवणूक केल्यानंतर निर्माण होणाऱ्या रोजगारापेक्षा पर्यटन क्षेत्रात तेवढय़ाच गुंतवणुकीत चारपट रोजगारनिर्मिती होते. स्थानिकांना त्याचा प्रामुख्याने लाभ होतो. त्यामुळेच शासनाने पर्यटन क्षेत्राच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले आहे. पर्यटन विकासासाठी स्वतंत्र संचालनालय स्थापन करण्यात येणार असून त्यात नाशिकसाठी स्वतंत्र विभाग असेल, असे त्यांनी सांगितले.

गोवर्धन येथे विकसित केलेल्या कलाग्रामला पारंपरिक बाजाराचे स्वरूप देण्याची गरज आहे. निवास-न्याहरी योजनेचा प्रसार, रिक्षा-टॅक्सी चालकांना पर्यटनाच्या दृष्टीने प्रशिक्षण देण्याची सूचना त्यांनी केली. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी शिर्डी, भंडारदरा, शनिशिंगणापूर, नांदूर-मध्यमेश्वर त्र्यंबकेश्वर आणि नाशिकचा समावेश असणारे विभागीय पर्यटन क्षेत्र विकसित करून पर्यटकांना अधिक संख्येने आकर्षित करता येईल, याकडे लक्ष वेधले.