वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेचे आयोजन

मागील दोन वर्षांपासून सातत्याने नाशिककरांना जगातील अव्वल पुरस्कारप्राप्त साहसपटांची मेजवानी उपलब्ध करून देणाऱ्या येथील वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेच्या वतीने यंदा ‘बाम्फ’च्या अव्वल वृत्तपटांसह इंडियन माऊंटेनिअरिंग फाऊंडेशनच्या ‘इंडियन माऊंटन फिल्म फेस्टिव्हल’ची मेजवानी दिली जाणार आहे. ३ व ४ जून रोजी दोनही दिवस तीन तासांचा महोत्सव महाकवी कालिदास कलामंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.

मागील वर्षांप्रमाणे यंदाही द हिमालयन क्लबने प्रसिद्ध अशा ‘बाम्फ माऊंटन फिल्म फेस्टिव्हल’चा मान नाशिकला दिला आहे. १९७६ पासून कॅनडातील अल्बर्टा येथे बांफ राष्ट्रीय उद्यानात अस्सल विविध साहसी खेळांवरच्या वृत्तपटाचा महोत्सव दरवर्षी आयोजित केला जातो. त्यातील सर्वोत्तम वृत्तपट जागतिक दौऱ्याकरिता निवडण्यात येतात. या महोत्सवाचा जगभरात मोठा प्रेक्षकवर्ग चाहता आहे. नाशिककरांनीही दोन वर्ष असाच उत्साह दाखविला.

वैनतेयच्या वतीने सह्याद्री व हिमालयात सातत्याने दुर्गभ्रमंती व साहसी मोहिमांचे आयोजन केले जाते. इतिहास व निसर्गसंवर्धन या विषयांवर विविध कार्यक्रम घेतले जातात.

डोंगरांवर बचाव व मदत कार्य केले जाते. त्याच साखळीत गिरीभ्रमणविषयक वृत्तपट महोत्सवाच्या रूपात आपल्या परिसरातील तरूण पिढी या खेळांकडे आकृष्ट व्हावी व साहसी खेळांची संस्कृती आपल्याही मातीत अधिक घट्टपणाने रुजण्यास मदत व्हावी, या अपेक्षेने वैनतेयने या महोत्साचे आयोजन केले आहे. पहिल्या दिवशी सायंकाळी सात ते १० बांफ महोत्सव, दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ ते १२ या वेळेत भारतीय साहसपट दाखविले जातील. नाशिककरांनी या महोत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बाम्फ सोबतच ‘इंडियन माऊंटन’ची मेजवानी

यंदा बाम्फ सोबतच इंडियन माऊंटन फिल्म फेस्टिव्हलची मेजवानी उपलब्ध करण्यात आली आहे. यंदाचे आयएमएफचे पहिलेच वर्ष असून त्याचे प्रथम सादरीकरण फेब्रुवारीत नवी दिल्ली येथे करण्यात आले. भारतातील डोंगर, नद्या, तलाव, वन येथील साहस व निसर्गावर आधारलेल्या या आयएमएफच्या वृत्तपटांना प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली आहे. नाशिककरांना पर्वतारोहण, सायकलिंग, रोईंग, कयाकिंग, पॅराग्लायडिंग, ट्रेकिंग, बायकिंग अशा विविध विषयांवरील साहसी वृत्तपट पाहण्याचा दुहेरी योग मिळणार आहे.