जिल्हा रुग्णालयात उपचार न झाल्याची तक्रार

नवजात बालकांच्या मृत्यूमुळे राज्यात गाजलेल्या येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर नसल्याने रात्रभर उपचारासाठी तडफडणाऱ्या अर्भकाचा अखेर मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. या बालकाला व्हेंटिलेटरसाठी आडगावच्या मविप्र रुग्णालयात पाठविण्यात आले होते. परंतु, तिथे व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने त्यास पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. व्हेंटिलेटरसाठी खासगी रुग्णालयात पाठविण्याच्या तयारीच्या दरम्यान या अर्भकाचा मृत्यू झाला.

जिल्हा शासकीय रुग्णालयात पाच महिन्यांत १८७ नवजात बालकांचे मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्र्यांसह पालकमंत्री, विरोधी पक्षनेते, विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयास भेट दिली होती. आरोग्यमंत्र्यांनी नवजात बालकांच्या उपचारांसाठीच्या विशेष कक्षात तातडीने सुविधा वृद्धिंगत करण्याचे आश्वासन दिले. विरोधी पक्षांनी आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. या घटनाक्रमानंतरही गोरगरिबांना उपचार मिळणे किती अवघड ठरते याची अनुभूती हरसूलच्या कहांडोळ कुटुंबाने घेतली.  हरसूल ग्रामीण रुग्णालयात हेमलता कहांडोळ या महिलेची सोमवारी रात्री प्रसूती झाली. ३२ आठवडय़ातच बाळाचा जन्म झाल्यामुळे त्याची प्रकृती नाजूक होती. यामुळे आईसह बाळाला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. नवजात शिशू कक्षात त्याच्यावर उपचार करण्यात आले. अर्भकाला व्हेंटिलेटरची नितांत गरज होती. प्राणवायू देऊन बाळाचा श्वासोच्छवास कायम राखण्याचा प्रयत्न केला गेला. अखेरीस डॉक्टरांनी कुटुंबीयांना बाळास व्हेंटिलेटर उपलब्ध असलेल्या मविप्र संस्थेच्या रुग्णालयात हलविण्यास सांगितले. त्यानुसार मंगळवारी रात्री कुटुंबीय बाळाला घेऊन आडगावच्या रुग्णालयात गेले. परंतु, तिथे व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने दाखल करून घेतले गेले नाही. कुटुंबीय पुन्हा जिल्हा रुग्णालयात परतले. एका खासगी रुग्णालयात ही व्यवस्था आहे. कुटुंबीयांच्या मागणीनुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिथे संपर्क साधला. त्यानुसार संबंधित ठिकाणी नेले जात असताना अर्भकाचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात उपचारास असमर्थता दर्शविली गेल्याने ही घटना घडल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली आहे.

तीन दिवसांत ११ वॉर्मर उपलब्ध होणार

जिल्हा शासकीय हे द्वितीय श्रेणीतील रुग्णालय आहे. या ठिकाणी ‘व्हेंटिलेटर’ ठेवण्यास परवानगी नाही.   पहिल्या टप्प्यात ११ वॉर्मर उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश जगदाळे यांनी दिली.  उपरोक्त बालकावर उपचार करण्यात आले. व्हेंटिलेटरची निकड कुटुंबीयांच्या निदर्शनास आणून दिल्याचा दावा त्यांनी केला. विशेष नवजात बालकांच्या उपचार कक्षात वॉर्मर कार्यान्वित करण्याच्या दृष्टिकोनातून प्राणवायूसाठी वाहिनी व इलेक्ट्रिकशी निगडित कामे पूर्णत्वास गेली आहेत. सीएसआर निधीतून तीन दिवसात वॉर्मर उपलब्ध होणार आहे, असे जगदाळे यांनी सांगितले.