इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या सीमेवरील वावी हर्ष परिसरात सोमवारी मृत अवस्थेत आढळलेल्या बिबटय़ाचा मृत्यू पाणी पिण्यासाठी गेला असताना धरणाच्या खोलीचा अंदाज न आल्याने अपघाताने झाल्याचा दावा वन विभागाने केला. बिबटय़ाची नखे व मिशा गायब असल्याने ग्रामस्थांनी त्याची हत्या झाल्याची साशंकता व्यक्त केली होती. परंतु, वन विभागाच्या अहवालाने बिबटय़ाच्या मृत्यूचे कारण पुढे आले आहे.
वैतरणा धरण परिसराच्या मागील बाजूला वावी हर्ष हा झाडाझुडपांनी व्यापलेला परिसर आहे. सोमवारी येथील रहिवासी असलेले सुभाष मधे यांच्या शेतालगत असलेल्या जलउपसा योजनेच्या वाहिनीनजीक मृत अवस्थेत बिबटय़ा आढळून आला. कुजल्याने त्याच्या अंगावरील नखे व मिश्या गायब असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या बाबत वनविभागाने घटनास्थळी धाव घेत जागेची पाहणी करत पंचनामा केला. बिबटय़ाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर अंगावर कोणतीही जखम आढळून आली नाही. मांसभक्षण केल्यानंतर बिबटय़ा पाण्याच्या शोधात धरण परिसरात आला. खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात पडला. बाहेर निघण्याचा प्रयत्न केला असता गाळात रुतला आणि श्वास घेता न आल्याने त्याचा मृत्यू झाला. धरणातील पाण्याने त्याचा मृतदेह ढकलत बाहेर फेकला गेला, तेव्हा हा प्रकार लक्षात आला. पाण्यात मृतदेह राहिल्याने कुजला. बिबटय़ाच्या अवयवाला जखमा नसल्याचे वन विभागाने म्हटले आहे.