त्र्यंबक येथील साधू-महंतांच्या बैठकीत सुरक्षेवरून चिंता

देशभरातील भोंदू साधू-महंतांची यादी जाहीर झाल्यानंतर अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता महंत मोहनदास हे हरिद्वार ते मुंबईच्या रेल्वे प्रवासात अकस्मात बेपत्ता झाले. यामागे काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय त्र्यंबकेश्वर येथे आयोजित साधू-महंतांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. ढोंगी साधू-महंतांचा शोध घेऊन शासनाने त्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी षडदर्शन आखाडा परिषदेने केली आहे.

डेरा सच्चा सौदाच्या गुरुमित सिंग ऊर्फ राम रहिमला बलात्कार प्रकरणात शिक्षा ठोठावली गेल्यावर आखाडा परिषदेने देशभरातील १४ भोंदू साधू-बाबांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर भोंदू बाबांच्या गुंडांकडून आखाडा परिषदेशी निगडित साधू-महंतांना धमक्या दिल्या जात असल्याबद्दल बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.  खऱ्या साधू महंतांकडे ना श्रीमंती आहे, ना सुरक्षा व्यवस्थेची तजवीज आहे. भोंदू बाबांची नावे जाहीर करून आखाडा परिषदेने त्यांच्यावर बहिष्कार टाकला आहे. महाराष्ट्रातही भोंदू साधू-महंतांचा धुमाकूळ सुरू आहे.  मोहनदास यांच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणात दोषींना तातडीने अटक करावी आणि शासनाने भोंदू बाबांवर कारवाई करणे आवश्यक असल्याकडे साधू-महंतांनी लक्ष वेधले आहे.

झाले काय?

  • बडा उदासीनचे महंत मोहनदास हे १५ सप्टेंबरला रेल्वेने हरिद्वारहून मुंबईला येत होते. प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले. त्यांचे अपहरण झाल्याची शक्यता परिषदेचे महामंत्री हरिगिरी महाराज यांनी व्यक्त केली.

भोंदू बाबा राजकीय पाठिंब्याने गर्भश्रीमंत झाले आहेत. त्यांच्या गुंडांनी अपहरण केलेल्या मोहनदास यांना पोलीस अद्याप शोधू शकलेले नाहीत. यामुळे आखाडा परिषदेशी संलग्न खरे साधू-महंत असुरक्षित झाले आहेत.

–  हरिगिरी महाराज, आखाडा परिषदेचे महामंत्री