राष्ट्रवादी काँग्रेसला हादरा; त्रिशंकू स्थिती

मागील पंधरा वर्षांपासून मिनी मंत्रालयावर वर्चस्व ठेवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेला स्वतंत्रपणे लढणाऱ्या शिवसेनेने हादरा दिला असला तरी सत्तेसाठी त्यांना इतरांशी जुगाड करणे भाग पडले आहे. या निवडणुकीत ७३ गटांत २५ जागा जिंकून शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष ठरला, तर सत्ताधारी राष्ट्रवादीला १८ जागा मिळून दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. सत्ताधारी भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, परंतु त्यांना १५ जागा मिळाल्या. काँग्रेसला आठ, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष तीन व अपक्षांनी चार जागांवर विजय मिळविला. जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थितीत सेनेला सत्तेचे समीकरण सोडविण्यासाठी भाजप वा अन्य पक्षांचे सहकार्य घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे.

नाशिक जिल्हा परिषदेच्या ७३ गट आणि पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी झालेल्या निवडणुकीचे धक्कादायक निकाल समोर आले. राज्यात सत्ता काबीज केल्यानंतर भाजप व शिवसेनेने ग्रामीण भागात अधिक वेगाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली होती. या निवडणुकीत उभयतांमध्ये युती झाली नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये काही तालुक्यांपुरतीच आघाडी सीमित राहिली. नोटाबंदीचा फटका भाजपला बसणार असे गृहीतक मांडले जात होते. निकालांद्वारे भाजप सत्तास्थानी पोहोचला नसला तरी सत्तेच्या चाव्या हाती ठेवण्यात काही अंशी यशस्वी झाला आहे. याशिवाय ग्रामीण भागात पाय रोवण्याचा मार्ग प्रशस्त झाला. बागलाण तालुक्यात सातपैकी चार जागा जिंकून भाजपने राष्ट्रवादीला हादरा दिला. काँग्रेस, राष्ट्रवादी व अपक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली.

मालेगाव तालुक्यात काही फरकाने तशीच स्थिती राहिली. सातपैकी पाच गटांत भाजप, तर शिवसेनेने दोन गटांत आपले वर्चस्व सिद्ध केले. देवळा तालुक्यात तीनपैकी एक जागा भाजपच्या, तर दोन जागा राष्ट्रवादीला मिळाल्या.

कळवण तालुक्यात राष्ट्रवादीला तीन, तर काँग्रेसला एक, सुरगाण्यात भाजपला एक, तर माकपला दोन, पेठमध्ये शिवसेनेने दोनही गटांत वर्चस्व प्रस्थापित केले.

दिंडोरी तालुक्यात सेनेला चार, तर काँग्रेसला दोन, चांदवडमध्ये भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी एका गटात यश मिळाले. नांदगाव तालुक्यात शिवसेना दोन, काँग्रेस व भाजपला प्रत्येकी एक, येवला तालुक्यात शिवसेना तीन, तर राष्ट्रवादी दोन गटांत, निफाड तालुक्यात राष्ट्रवादी पाच, शिवसेना तीन, भाजप व अपक्षांना एका गटावर यश मिळाले. नाशिक तालुक्यात तीन गटांत राष्ट्रवादी व एका गटात अपक्ष, त्र्यंबकेश्वरमध्ये माकप, काँग्रेस व अपक्षाला प्रत्येकी एका जागेवर यश मिळाले. इगतपुरी तालुक्यात शिवसेनेला तीन, काँग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी एका गटात, तर सिन्नर तालुक्यात पाच गटांत शिवसेनेचा भगवा फडकला, तर एका गटात भाजपला यश मिळाले.

पंचायत समितीतही शिवसेना अव्वल

नाशिक जिल्ह्य़ात १५ पंचायत समितीच्या १४६ पैकी सर्वाधिक ६० जागा जिंकून शिवसेनेने पहिला क्रमांक मिळविला. राष्ट्रवादीला ३२, भाजप २७, काँग्रेस ११, माकप सात, तर अपक्षांना ९ जागा मिळाल्या.

 

पक्षीय बलाबल

एकूण गट – ७३

शिवसेना – २५

राष्ट्रवादी काँग्रेस – १८

भाजप – १५

काँग्रेस – ८

माकप – ३

अपक्ष – ४