नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी उपअभियंत्यास ५ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. धनंजय सुरेश खैरनार असं या कर्मचाऱ्याचे नाव असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून बुधवारी ही कारवाई करण्यात आली.
चांदवड तालुक्यातील शिंगवे याठिकाणी एका लॉनसाठी ३ फेज एसटी लाईन, कमर्शियल मीटर, तसेच दोन पोल टाकून त्यावर विद्युत तारा बसवून वीजपुरवठा जोडण्याचे काम एका इलेक्ट्रिक कंत्राटदारास देण्यात आले होते.

या कामाचे अंदाजपत्रक उपविभागीय कार्यालयाकडे पाठविण्यासाठी खैरनार यांनी कंत्राटदाराकडे १५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यावरून संबंधित कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे खैरनार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
कंत्राटदाराच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कार्यालयातच अभियंत्याला रंगेहात पकडून अटक केली. पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, उपधिक्षक सुनिल गागुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.