नाशिकच्या औद्योगिक क्षमतेचे प्रदर्शनातून सादरीकरण

‘मेक इन नाशिक’ उपक्रमाचे आज मुख्यमंत्रांच्या हस्ते उद्घाटन

नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा) आणि क्रेडाई यांच्या वतीने ३० व ३१ मे या कालावधीत देशाची आर्थिक राजधानी अर्थात मुंबईत ‘मेक इन नाशिक’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मंगळवारी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर रेल्वेमंत्री सुरेश प्रभु, उद्योगमंत्री सुभाष देसाई, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आदींच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

बडय़ा उद्योगांना नाशिकमध्ये गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्याबरोबर स्थानिक पातळीवरील छोटय़ा उद्योगांना नव्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने निमाने ‘मेक इन नाशिक’ची संकल्पना मांडली. या उपक्रमास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात महाराष्ट्र शासनाचेही सहकार्य लाभले आहे. मुंबईतील वरळीस्थित नेहरू सेंटर ऑडिटोरियम येथे हा उपक्रम होत आहे. उद्घाटन सोहळ्यास नाशिकचे खा. हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे व सीमा हिरे आदी उपस्थित राहणार आहेत. उपक्रमात बडे उद्योग समूह, विविध देशातील दूतावासातील अधिकारी, निर्यात प्रोत्साहन संस्था आदींना निमंत्रित करण्यात आले आहे.

नाशिकमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणुकीला चांगली संधी आहे. स्थानिक पातळीवर वाहन, इलेक्ट्रिकल व कृषी प्रक्रिया उद्योग एकत्रितपणे नांदतात. या क्षेत्रातील पुरवठादारांची संख्या अतिशय मोठी आहे. या सर्वाची माहिती उपक्रमाद्वारे सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘मेक इन नाशिक’मध्ये खास प्रदर्शन साकारण्यात आल्याचे निमाचे उपाध्यक्ष मंगेश पाटणकर यांनी सांगितले. विद्यमान औद्योगिक क्षमता, उपलब्ध पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ, मुबलक वीज व पाणी, शासकीय व खासगी औद्योगिक वसाहतीतील जागा आदी बलस्थानांचे विपण करीत नाशिक हे गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचे पटवून देण्यात येईल. माहिती तंत्रज्ञानातील उद्योगांना चालना देण्याचा प्रयत्न आहे. या क्षेत्रात ‘स्टार्ट अप’ सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी विचारमंथन होणार आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा

उद्घाटन सोहळ्यात सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या नाशिकवर आधारित लघुपटाचे सादरीकरण होऊन चर्चासत्र होईल. दुपारच्या सत्रात नाशिकमध्ये उद्योगाची मुहूर्तमेढ रोवून वेगवेगळ्या क्षेत्रात यशोशिखरे गाठणाऱ्या उद्योजकांची यशोगाथा सादर होणार आहे. त्यात ईएसडीएस सॉफ्टवेअरचे पीयूष सोमाणी, सुला वाईनचे नीरज अग्रवाल, सह्यद्री फार्मचे विलास शिंदे, ऋषभ इन्स्ट्रमेंट्सचे नरेंद्र गोलिया, अशोक कटारिया यांचा समावेश आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सकाळच्या सत्रात शहराच्या विकासात उद्योजकांचे योगदान, दुपारी ‘नेफा व्हॅलीपासून ते सिलीकॉन व्हॅलीपर्यंत’ – शहराचे बदलते प्रवाह’ या चर्चेनंतर चार वाजता उपक्रमाचा समारोप होणार आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक इन महाराष्ट्र’मध्ये विविध उद्योगांशी केंद्र व राज्य सरकारने सामंजस्य करार केले आहेत. हे करार करणाऱ्या उद्योगांना नाशिकच्या औद्योगिक सक्षमतेची माहिती दिली जाईल. प्रदर्शनात सुखोई विमानांची बांधणी करणारा एचएएल, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, बॉश, जिंदाल, सिग्नेचर, सॅमसोनाईट, इप्कॉस, अशोका बिल्डकॉन आदी उद्योगांसह क्रेडाई व मऔविमही सहभागी होणार आहे. ‘मऔविम’मार्फत औद्योगिक क्षेत्रात झोननिहाय उपलब्ध जागा, मूलभूत सुविधा याबद्दल माहिती देण्यात येणार असून या ठिकाणी अधिकाधिक सामंजस्य करार करण्याचा प्रयत्न आहे.